(संगमेश्वर)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुरळ परिसरातील महामार्गावर साईड पट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड टाकण्यात आले असून, त्यामुळे चालणाऱ्यांना आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
या परिस्थितीबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाप्रमुख कृष्णा हरेकर यांनी, “तुरळ ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ लवकरच ठेकेदार कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहेत,” असे सांगून त्यांनी ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा निषेधही नोंदवला.
महामार्गावर गतिरोधक, सूचना फलक वा कोणतेही सुरक्षिततेचे उपाय न करता काम सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी शाळा, हायस्कूल आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक रोजच्या वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करून रस्त्यालगत माती आणि दगड टाकल्याने नागरिकांत संतापाची भावना आहे.
कोणत्याही प्रकारचे गतिरोधक अथवा दिशादर्शक फलक न लावल्याने तसेच रस्त्याच्या मध्यभागी माती टाकल्याने संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक संतोष थेराडे यांनी ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आता शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखांनीही आंदोलनाचा इशारा दिल्याने ठेकेदार कंपनीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. या आंदोलनात ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती हरेकर यांनी दिली.