(मुंबई)
राज्याचे नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांनी सोमवारी आपल्या पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पांडे यांना मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांनाही यावेळी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ देण्यात आली. राज्यात माहितीच्या अधिकाराचा कायदा अंमलबजावणी करण्यास नवीन नियुक्त्यांमुळे बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा छोटेखानी शपथविधी समारंभ पार पडला. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. त्यानंतर शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.
दरम्यान, शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती आणि जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्य माहिती आयोगाची स्थापना संबंधित राज्य सरकारकडून राजपत्र अधिसूचनेद्वारे केली जाते. एक राज्य मुख्य माहिती आयुक्त (SCIC) आणि “१० पेक्षा जास्त नसलेले राज्य माहिती आयुक्त (SIC)” राज्यपालांकडून नियुक्त केले जातात.SIC चे मुख्यालय राज्य सरकारने निर्दिष्ट केले आहे. याशिवाय, राज्यातील इतर कार्यालये राज्य सरकारच्या मान्यतेने स्थापन करावीत. तथापि, राज्य आयोग कोणत्याही अन्य अधिकाऱ्याच्या अधीन न राहता आपले अधिकार वापरण्यास मुक्त आहे. जर वाजवी कारणे असतील तर SIC ला चौकशीचे आदेश देण्याचा अधिकार आहे; तपासणीसाठी समन्स बजावणे; सार्वजनिक प्राधिकरणाला सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO) किंवा सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी (APIO) नियुक्त करण्याचे निर्देश देणे जेथे अस्तित्वात नाही; आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून वार्षिक अहवाल मागवणे. जिथे केंद्रीय माहिती आयोगाला (CIC) वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकारला वार्षिक अहवाल सादर करावा लागतो, तिथे राज्य माहिती आयोगाला राज्य सरकारला अहवाल द्यावा लागतो.