( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
तालुक्यातील निवळी येथील अलीकडच्या शॉक प्रकरणाचा धसका अजून कायम असतानाच हातखंबा तिठा येथील कांबळे यांच्या घरासमोर पुन्हा एकदा महावितरणच्या निष्काळजीपणाचे ताजे उदाहरण समोर आले आहे. आज २२ जुलै पहाटेच्या सुमारास विद्युत खांबावरची एक वाहिनी तुटून थेट घरासमोर रस्त्यावर कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
सकाळी नागरिकांना जाग येताच रस्त्यावर कोसळलेली ही वायर पाहिली आणि लगेच येथील महावितरणचे अधिकारी यांना संपर्क साधून त्यानंतर हातखंबा गावचे सरपंच तारवे यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेत तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. या भागात महावितरणच्या विद्युत खांबांना जंगली वेलींनी अक्षरशः विळखा घातला आहे. कुठे खांब झुकलेले, कुठे तारा सैल, कुठे खांबावर झाडांच्या फांद्या टेकलेल्या अशा परिस्थितीत देखरेख आणि साफसफाई याकडे महावितरणचं प्रचंड दुर्लक्ष असल्याचे चित्र स्पष्ट होते. घरासमोर पडलेली विद्युत वाहिनी पडल्यानंतर येथील नागरिक संतप्त असून “या तारा नेमक्या पडतात तरी कशा?” असा रोष व्यक्त करत आहेत. निवळी येथील प्रकरणानंतरही विभाग जागा न होणे, ही महावितरण अधिकाऱ्यांची बेपर्वा वृत्ती अधोरेखित करते. दरम्यान महावितरणचे वायरमन घटनास्थळी दाखल होऊन तुटलेली वायर बाजूला केली आहे, मात्र गेल्या तीन तासांहून अधिक काळ विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तो अद्यापही वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आलेला नाही.
हातखंबा तिठ्यावरची घटना ही पुन्हा एकदा दाखवून देते की, महावितरणला तातडीने शिस्त लावण्याची वेळ आली आहे. अन्यथा उद्या कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? तारा तुटून पडण्याचे प्रकार थांबणार कधी? निवळीप्रमाणेच या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरणच्या देखरेख यंत्रणेकडे बोट दाखवले जात आहे. केवळ घटनांनंतर कार्यवाही करण्यापेक्षा, या यंत्रणांनी वेळेवर आणि नियोजनपूर्वक देखभाल करणे गरजेचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.