(दापोली)
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेत बहुजन हिताय आगरवांगणीचे मुख्याध्यापक सत्यवान दळवी यांनी पदव्युत्तर पदवीधर शिक्षक या गटातून तृतीय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेत मुख्याध्यापक सत्यवान दळवी यांचा दापोली तालुकास्तरावर प्रथम, बहुजन हिताय विद्यामंदिर आगवायंगणी विद्यालयातील शिक्षिका जयश्री अण्णाराव रिंगणे यांचा व्दितीय तर शिक्षक शैलेश भरत वैद्य यांचा तृतीय क्रमांक, जिल्हास्तरावर निबंध स्पर्धेत मुख्याध्यापक सत्यवान दळवी यांचा प्रथम आणि राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
मुख्याध्यापक सत्यवान दळवी यांनी १३ वे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन यामध्ये ही निबंध स्पर्धेत यश संपादन केले होते. सत्यवान दळवी हे मुख्याध्यापक, पत्रकार, क्रीडाशिक्षक, तालुका समन्वयक, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन कार्यकारिणी सदस्य, दापोली अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष, दापोली तालुका मराठी पत्रकार संघ खजिनदार, श्रीजी गुलमोहर सोसायटी डी-२ खजिनदार अशा विविध पदांवर कार्यरत आहेत.
दापोली तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन करताना सचिव चंद्रकांत मोरे यांनी सदिच्छा देताना, “आपल्या सखोल अभ्यासपूर्ण लेखनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून मांडलेले विचार, समाजाभिमुख दृष्टी आणि शिक्षक म्हणून असलेली बांधिलकी यांची राज्यपातळीवर दखल घेतली जाणे ही संपूर्ण शिक्षक वर्गासाठी अभिमानाची बाब आहे. मुख्याध्यापक म्हणून आपण शाळेच्या गुणवत्तावृद्धीसाठी तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या या यशामुळे दापोली तालुक्याचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल झाले असून, भावी शिक्षकांसाठी आपण प्रेरणास्थान ठरलात. भविष्यातही आपल्या लेखन, संशोधन व शैक्षणिक कार्यातून शिक्षण क्षेत्राला नवे आयाम मिळोत” असे गौरवोद्गार काढले.

