(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाच्या दापोली कृषी महाविदयालयातील ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत चिखलगाव येथे १७ जुलै रोजी, बचतगटातील महिलांना सहयाद्री गटातर्फे दूध आणि फळांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कृषी संबंधित व्यवसायांना चालना देणे, महिलांना स्वावलंबी बनवणे व गावाच्या विकासाला हातभार लावणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला सौ. निशा नरेंद्र पांदे (प्रगती ग्रामसंघाच्या अध्यक्षा), सौ. सुष्मिता गायकर (प्रगती ग्रामसंघाच्या कोषाध्यक्षा) आणि सौ. संगीता उसरे (सी. आर. पी) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच ‘स्वावलंबी’, ‘मंगलमूर्ती’ ‘श्री काळेश्वरी माता’ व ‘सत्यनारायण’ या बचतगटाच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शविली. या कृषी प्रात्यक्षिकामध्ये मसाला पनीर, बासुंदी, पपई जॅम आणि टोमॅटो केचप यांची प्रमाणित कृती दाखविण्यात आली तसेच कार्यक्रमा दरम्यान तयार करण्यात आलेल्या पदार्थाचे नमुने उपस्थिताना चाखण्यासाठी दिले गेले. याशिवाय पॅक्ड फूड मधील भेसळ याविषयी महिलांना जागरूक करण्यात आले. तसेच महिलांना कृषी संबंधित व्यवसायातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविदयालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर एल कुणकेरकर यांच्यासह डॉ नरेंद्र प्रसादे, डॉ महेश कुलकर्णी व डॉ. प्रविण झगडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सौं, संगीता उसरे, सी. आर. पी. यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात एकूण 30 महिलांनी सहभाग नोंदविला व उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.