(पुणे)
पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या पिंपरी पोलीस स्टेशनमधील एका पोलीस उपनिरीक्षकास ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने (ACB) मंगळवारी, १५ एप्रिल रोजी सापळा रचून रंगेहात अटक केली. निलेश बोकेफोडे (वय ३८ वर्षे), पद – पोलीस उपनिरीक्षक, वर्ग २ (अराजपत्रित), पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – असे अटकेतील अधिकाऱ्याचे पूर्ण नाव आहे. या प्रकरणात २४ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB च्या पथकाने सत्यता पडताळून सापळा रचला आणि लाच घेताना बोकेफोडे यांना रंगेहात पकडले. सदर प्रकरणामुळे पोलीस खात्याच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, लाचखोरीविरोधातील कारवायांमध्ये ACB चा सक्रिय सहभाग अधोरेखित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात त्यांना मदत करण्यासाठी व नमूद गुन्ह्यात तक्रारदाराचे जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्यासाठी उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयाची लाच मागणी केली. त्यानंतर 24 वर्षीय तरुणाने दि. 11 एप्रिल 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे याबाबत तक्रार दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. 11 एप्रिल 2025 व दि. 12 एप्रिल 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक निलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी सुरुवातीला 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवार दि. 15 एप्रिल 2025 रोजी लोकसेवक निलेश बोकेफोडे यांना तक्रारदाराकडून पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत मोहन नगर पोलीस चौकी येथे 30 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.