(ठाणे / वृत्तसंस्था)
मानपाडा येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक झाली असून, घटनेला 72 तास उलटूनही उर्वरित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे ठाण्यात संताप व्यक्त होत असून, हत्येचे मास्टरमाईंड अद्याप मोकाट असल्याने ठाणे पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना भक्कमपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचेही ठाकरे यांनी कुटुंबीयांना सांगितले.
या प्रकरणाच्या तपासाबाबत पूर्णेकर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केलेल्या व्यक्तींची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. मृत प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम आणि भाऊ जयनाथ यांच्या फिर्यादीवरून कापूरबावडी पोलिसांनी पुरवणी जबाब नोंदवून घेतला. या पुरवणी जबाबात शिंदे सेनेच्या माजी महापौर तथा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित संशयितांवरील आरोपांची सत्यता पोलिसांनी तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या पथकात पोलिस अधिकारी, कर्मचारी मिळून एकूण २३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. अशातच पोलिसांकडून या हत्येच्या अनुषंगाने चौकशीसाठी विविध व्यक्तींना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं जात आहे. या प्रकरणात गुरुवारी तीन महिलांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे समजते. तसंच पुर्णेकरांची हत्या करण्यासाठी आरोपींनी ज्या वाहनांचा वापर केला होता त्यातील दोन वाहने जप्त करण्यात आली असून या वाहनांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या दोन वाहनांपैकी एक वाहन आरोपीच्या भाच्याच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. तर दुसरे वाहन ठाण्यातील एका तरुणीच्या नावावर असल्याचे समजते. संबंधित तरुणीने ही दुचाकी आपल्या मित्रासाठी कर्ज काढून घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पूर्णेकर हत्या प्रकरणात याच दुचाकीचा वापर झाल्याने पोलिसांनी संबंधित तरुणीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात तिची नेमकी काही भूमिका आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात असून चौकशीनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांच्यावर केला आहे. घटनेनंतर एकही स्थानिक नगरसेवक येथे फिरकला नाही, असेही त्यांनी म्हटले. “या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या मीनाक्षी शिंदे यांचं नगरसेवक पद रद्द झालं पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. माझ्या पतीच्या हत्येचा मास्टरमाइंड मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. हल्लेखोरांना फाशीची शिक्षा द्यावी. त्यांना सहा महिन्यांनी सोडून देऊ नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिनाक्षी शिंदेंच्या डोक्यावरचा हात काढावा, त्यांचे नगरसेवक पद रद्द करावं, आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पूर्णेकरांच्या पत्नीने केली.
माजी महापौर मीनाक्षी शिंदे या एवढ्या खालच्या थरावर जाऊन काम करत आहेत, असा आरोप विजेता पूर्णेकर यांनी केला. मीनाक्षी शिंदे आता घाबरल्या असून त्या समोर येत नाहीत, असेही त्यांनी म्हटले. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
काय आहे प्रदीप पूर्णेकर यांच्या शेवटच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये?
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांचे शेवटचे व्हॉट्सअॅप स्टेटस समोर आले आहे. हेच स्टेटस त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही पोस्ट केले होते. या व्हिडीओमध्ये पूर्णेकर यांचे काही फोटो असून, पार्श्वभूमीला एक ऑडिओ क्लिप ऐकू येते.
या ऑडिओ क्लिपमध्ये, “एक बडा डाव खेलना है इस बार! जादा से जादा क्या होगा, या तो अपना अध्याय समाप्त, या फिर एक नया अध्याय का प्रारंभ,” असे म्हटले आहे. पूर्णेकर यांनी हेच हिंदीतील वाक्य आपल्या स्टेटसला ठेवले होते.
या स्टेटसमधील मजकुरामुळे आता विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. पूर्णेकर यांनी हे सूचक विधान नेमके कोणत्या संदर्भात केले होते, त्यांना कोणत्याही संभाव्य हल्ल्याची किंवा घातपाताची चाहूल लागली होती का, तसेच ते एखादा मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत होते का, या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.


