(राजापूर)
तालुक्यातील माडबन येथे नाटककार वस्त्रहरणकर गंगाराम गवाणकर यांनी आपल्या घराशेजारी 25 वर्षांपूर्वी श्री हनुमान मंदिर उभारले आहे. गेल्या 24 वर्षांपासून अव्यातपणे ते या मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न करतात. यावर्षी या उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. विविध धार्मिक उपक्रमांच्या आयोजनाने या मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.

सायंकाळी मीठगवाणे येथील पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रवर्तक श्रीधर पावसकर यांचे चिरंजीव सध्या मुंबईस्थित असलेले गणेश व प्रकाश श्रीधर पावसकर यांचा कराओके गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान पत्रकार राजन लाड आणि गवाणकर यांचे चिरंजीव स्वप्निल गवाणकर यांनी देखील आपली कला सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
गंगाराम गवाणकर यांनी पावसकर बंधुसह पत्रकार राजन लाड तसेच फ्लॅश आर्ट अकॅडमीचे राकेश दांडेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील केला. या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला परिसरातील भाविकांनी हजेरी लावली.