( खेड )
तालुक्यातील एका गावात घडलेल्या बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनेत आरोपी प्रशांत कमलाकर बनकर (४० वर्षे रा. टिटवाळा ईस्ट, कल्याण, ९ मुंबई) याला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
तालुक्यातील एका गावात आरोपी प्रशांत कमलाकर बनकर (४० वर्षे रा. टिटवाळा ईस्ट, कल्याण मुंबई) हा पीडित मुलीच्या घरी मे २०१३ मध्ये पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांकडे कार्यक्रमास ड्रायव्हर म्हणून मुंबईवरुन आला होता. गाडीतील लोक कार्यक्रमामध्ये व्यस्त असताना आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आणि पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या प्रकारानंतर पीडित मुलीने दि. १५ मे २०१३ रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रशांत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खेड अतिरिक्त सत्र न्यायालयात त्याच्या विरोधात खटला सुरू होता. भारतीय दंड विधान कलम ३५४ (अ) (२), ४५१ आणि पोक्सो कायदा कलम ८ खाली न्यायालयाने त्यास दोषी ठरवले आहे. त्याला ‘पोक्सो’ कायद्यानुसार ३ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा, भारतीय दंड विधानाचे कलम ३५४ (अ) (२) अन्वये तीन महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक आठवडा साध्या कारावासाची शिक्षा, भारतीय दंड विधानातील कलम ४५१ अन्वये तीन महिने सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक आठवडा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावणेत आली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. या कामी पीडितेची साक्ष व कागदोपत्री पुरावा न्यायालयासमोर मांडण्यात आला. सरकारी वकील ॲड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपूर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक पोलिस अंमलदार शहाजी पवार, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे खेड तसेच कोर्ट पैरवी चंद्रमुनी ठोके यांचे खटल्यात सहकार्य लाभले.