(मंडणगड /रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यात २०१७ साली घडलेल्या खळबळजनक खुनाच्या प्रकरणातील तिघा आरोपींना खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ. पी. एस. चांदगुडे यांनी गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी हा निकाल जाहीर केला. सदर गुन्हा मंडणगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७/२०१७ व सेशन केस नं. ०४/२०१८ या क्रमांकाने नोंदवण्यात आला होता. अभिजीत सुधाकर जाधव (वय २७, रा. गव्हे, ता. दापोली), नरेंद्र संतोष साळवी (वय २८) आणि अक्षय विष्णू शिगवण (वय २८, रा. बोंडीवली, ता. दापोली) या तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९२, ३९७, १२० (ब) आणि २०१ अंतर्गत दोषी ठरवत कठोर शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालयाने आरोपींना कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड, कलम ३९२ आणि ३९७ अंतर्गत सात वर्षांची सश्रम कैद व दंड, तसेच कलम १२० (ब) आणि २०१ अंतर्गत पुन्हा जन्मठेप व प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास प्रत्येक कलमासाठी तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार असून, आरोपींकडून मिळालेल्या दंडाच्या एकूण रकमेपैकी २०,००० रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या घटनेचा तपशील असा की, ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी राजाराम बाळकृष्ण चव्हाण यांचा खून करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि दोन मोबाईल फोन आरोपींनी लुटून नेले होते. पैशाच्या हव्यासाने पछाडलेल्या आरोपींनी संगनमताने ही योजना आखली. साक्षीदार बाबाजी रामा निर्मल यांच्या हरविलेल्या मोबाईल सिमकार्डचा वापर करून त्यांनी परस्पर संदेशवहनाद्वारे खूनाचा कट रचला. आरोपींनी मयत चव्हाण यांना टाटा मॅजिक (एमएच ०८ झेड ९३८९) गाडीद्वारे प्रवासाचे आमिष दाखवून बोलावले आणि तिक्ष्ण हत्यार व दगडांनी हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पुलाखालील सिमेंट पाईपमध्ये फेकून देण्यात आला होता.
या प्रकरणात सरकार पक्षाने सादर केलेल्या ३२ साक्षीदारांच्या साक्षा, मोबाईल लोकेशन, सीडीआर, एसडीआर अहवाल, न्यायवैज्ञानिक पुरावे आणि पोस्टमार्टम रिपोर्ट या सर्वांचा आधार घेत न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे अभियोजिका सौ. मृणाल जाडकर यांनी सखोल युक्तिवाद करत आरोपींच्या गुन्ह्याचे विवेचन केले. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी पार पाडली, तर न्यायालयीन कार्यवाहीसाठी पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पवार आणि महिला पोलीस हवालदार वैशाली सुकाळे यांनी सहाय्य केले. मंडणगड तालुक्यातील या खळबळजनक खुनाच्या प्रकरणाला आठ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला आहे. स्थानिक पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे आणि सरकारी वकिलांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपींना शिक्षा झाल्याने समाज स्तरावर समाधान व्यक्त केले जात आहे.

