(रत्नागिरी)
जिल्हा परिषदेच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार करणाऱ्या तत्कालीन प्रभाग संघ व्यवस्थापक दोघा महिलांना शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. मुग्धा शैलेश शेट्ये व संगीता रामदास मोरे (दोन्ही रा. शिरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा महिलांची नावे आहेत. अपहाराचा प्रकार . समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
महिला क्रांती महिला प्रभाग संघ शिरगाव व आरंभ ग्राम संघ उन्नती ग्राम संघ शिरगावच्या बैठक अहवाल नोंदवही व जमाखर्च नोंदवहीत मुग्धा शेट्ये व संगीता मोरे यांनी खाडाखोड करून त्यावर लेखन व व्हाईट शाईचा वापर केल्याचे समोर आले होते. अंतिम चौकशी जिल्हा अभियान सहसंचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखाधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे केली असून तसा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता. तत्कालीन प्रभाग संघ व्यवस्थापक मुग्धा शेट्ये व तत्कालीन प्रभाग संघ अध्यक्ष संगीता मोरे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेकडून शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
एकूण ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार गेल्या पाच वर्षात केल्याचे दिसून आले. रत्नागिरी शहर पोलिसांकडून या प्रकरणी मुग्धा शेट्ये व संगीता मोरे या दोन महिलांवर भादंविक ४२०, ४६७,४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलांनी १८ जुलै २०१८ ते २ एप्रिल २०२३ रोजीच्या दरम्यान क्रांती महिला प्रभाग संघ शिरगाव येथे ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसांकडे केल्याने शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.