(रत्नागिरी)
अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख वव डिजीटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली राबविण्यास आजपासून सुरुवात झाली. परप्रांतीय मच्छिमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर आता यामुळे रोख लागणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पालघरमधील शिरगाव, ठाण्यामधील उत्तन, मुंबई उपनगरातील गोराई, मुंबई शहरमधील ससून गोदी, रायगडमधील वर्सोली व श्रीवर्धन, रत्नागिरीमधील भाट्ये व मिरकरवाडा, सिंधुदूर्गमधील देवगड या 9 ठिकाणांवरुन ड्रोनद्वारे देखरेख होणार आहे. येथील भाट्ये समुद्रकिनारी अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ड्रोन हवेत समुद्रावर झेपावला.
याप्रसंगी मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले होते. आज सुरु झालेल्या प्रणालीमुळे सागरी सुरक्षा बळकट होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रातील पारंपरिक मच्छीमारांचे हित जोपासण्यासाठी तसेच परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी रोखण्यासाठी म.सा.म.ति.अ १९८१ (सुधारित २०२१) या अंमलामध्ये असलेल्या कायद्यांतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांद्वारे गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते.
गस्तीनौकेद्वारे समुद्रामध्ये गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही. अनधिकृत नौकांचा पाठलाग करत असताना त्या पळून जात असतात. अशा वेळेस गस्ती नौकेसह राज्याच्या जलधीक्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापरामुळे योग्य नियंत्रण राखण्याकरिता व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यास मदत होईल. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिक क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येईल. ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभाग सुलभरित्या उपलब्ध होऊ शकेल. ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहे.
एक दिवसामध्ये (२४ तासांच्या कालावधीत) 120 सागरी मैलाचे सर्वेक्षण करण्यात येईल. एका दिवसामध्ये 6 तास सर्वेक्षण करणे बंधनकारक. ड्रोनच्या उड्डाणानंतर प्राप्त झालेली माहिती (रेकॉडेड डाटा) संबंधित जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिला जाईल तसेच सर्वेक्षण हे कंट्रोल रुमपर्यंत वेब स्ट्रिमींगद्वारे पुरवण्यात येईल. ट्रॉलर नेटद्वारे मासेमारी, पर्ससिन पद्धतीने मासेमारी, गिल नेट पद्धतीने मासेमारी, एलइडी/डायनामाईट/रसायने वापरुन करण्यात येणारी अवैध पद्दतीची मासेमारी, नोंदणीकृत नौका क्रमांक, नाव व जिल्ह्याचा कलरकोड यांची नोंद नसलेल्या मासेमारी नौका, पावसाळी बंदी कालावधी (1 जून ते 31 जुलै) मध्ये अवैधरित्या मासेमारी करत असलेल्या यांत्रिक नौकांची (मोटाराइज/मेकॅनाइज) तपासणी, हवामान इशारे (उदा. वादळ) देण्यात आलेल्या कालावधीमध्ये मासेमारी करत असलेल्या नौका या अवैध बाबीबर संबंधित अंमलबजावणी अधिकारी कारवाई करतील. कर्नाटकातील मलपी येथील अतिक्रमण करणाऱ्या मासेमारी नौकेवर कारवाई करत ताब्यात घेणाऱ्या नौका विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.