(संगमेश्वर / एजाज पटेल)
वनविभागाच्या रात्रीच्या गस्तीला न जुमानता बिबट्याचा संगमेश्वर शहरासह अनेक तालुक्यात अनेक ठिकाणी दर्शन देऊन आपले वास्तव्य आणि मुक्त संचार सुरु असल्याचेच पावलोपावली जणू पुरावेच देत आहे. कारण शहरातील अंतर्गत रस्ते तसेच मानवी वस्तीत भटकंती करणारा बिबट्या मुंबई-गोवा महार्गांवर संगमेश्वर येथे असलेल्या दानिश चायनीज सेंटरच्या समोरून जाणाऱ्या महामार्गलगतच्या साईडपट्टीवर रुबाबात बसलेला स्वतः दानिश पाटणकर यांना दिसला. त्यांनी त्या बिबट्याला स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यातही कैद केले आहे.
गेले काही दिवस संगमेश्वर शहरासह आजबाजूच्या परिसरात बिबट्याचा धुडगुस सुरु असल्याने त्याच्या दहशतीने संगमेश्वर शहरासह आजूबाजूचा परिसर अक्षरशः हादरून गेला आहे. संगमेश्वर शहर आणि परिसर बिबट्याच्या भीतीने सायंकाळी लवकर चिडीचूप होते. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी पाळीव प्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलभाग सोडून बिबट्या थेट शहरासह मानवीवस्तीत घुसून भटकंती करत आहे. या बिबट्याच्या छबी काही लोकांच्या कॅमेऱ्यात कैदही झाल्या आहेत. त्या काहींनी इतर ठिकाणी शेअरही केल्या आहेत. याचे व्हीडिओ व फोटोंसह बातम्याही प्रसारित झाल्याअसल्याने ग्रामस्थांच्या मनात आणखी धडकी भरली आहे. मानवी वस्तीत पाळीव प्राण्यांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याचा हल्ला आता माणसाच्या जीवावरही बेतू शकतो अशी भीती वर्तवण्यात येत आहे.
आज या ठिकाणी बिबट्या दिसला, तर उद्या अन्य कोणाला बिबट्या चे दर्शन झाले, असे रोज सुरू आहे. कधी याचा कुत्रा फस्त केला तर अन्य कोणाच्या गाईचा फडशा पाडला, तर कोणाला भररस्त्यातच बिबट्या दिसला अशी रोजचीच चर्चा, व्हाट्सअपला फिरणारे संदेश व्हिडीओ, फोटो तसेच वृत्तपत्र, डिजिटल मीडिया मधून प्रसारित होणाऱ्या बातम्या यामुळे अनेक भागात बिबट्या दिसत असल्याची वार्ता पसरून भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याची ही दहशत दूर करणे वनाचे रक्षणकर्ते व वन्यजीवपासून मानवजातीचे सरक्षण करणाऱ्या वनविभागाचे असल्याने त्यांनी बिबट्याचा वावर कोठे आहे? बिबट्या येतो कोठून, त्याचा मार्ग टिपण्यासाठी चार ते पाच ठिकाणी कॅमेरा लावण्याची तसदी घेतली. एवढेच नव्हे तर वनविभागाचे काही कर्मचारी संगमेश्वर भागातील वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर गस्त घालत आहेत. मात्र त्यांनी लावलेल्या एकाही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला नसल्याचे तसेच गस्ती दरम्यान बिबट्याचा वावर दिसून न आल्याची माहिती वनपाल तौफिक मुल्ला यांनी दिली. मात्र बिबट्याचा वावर आणि मुक्तसंचार आजही कायम असल्याचे पुरावे रोज ग्रामस्थांना मिळत आहेत. नुकताच संगमेश्वर सह्याद्री पॅलेस येथे असलेल्या मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गलगत लागून असलेल्या नामांकीत दानिश चायनीज सेंटर चे मालक दानिश पाटणकर यांना रस्त्याच्या बाजूला अगदी रुबाबात बिबट्या बसलेला दिसून आला. या बिबट्याची छबी त्यांना स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यात त्यांनी टिपली आहे.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवर रात्रंदिवस छोट्या मोठ्या वाहनांची रेलचेल चालूच असते, अशा ठिकाणी सुद्धा “ना कसले भय, ना कसला डर” या अविर्भावात बिबट्याचे शहरात रुबाबात होणारे आगमन म्हणजे आपले वास्तव्य, मुक्तसंचार आणि दहशत आजही कायम असल्याचा तो वनविभागाला जणू पुरावा तर देत नसेल ना, याचीच चर्चा आता सर्वत्र रुंगू लागली आहे.