भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या मार्गदर्शनातून छोटे छोटे व्यावसायिक घडावे व्यवसायासाठी अपार मेहनत करण्याची ताकद आमच्या महिलांमध्ये आहे त्या ताकतीने व्यवसाय उभे करावेत, असे आवाहन महिला बालकल्याण समिती सभापती सौ शिल्पा सुर्वे यांनी भारतीय उद्योजकता विकास प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या कार्यालयामध्ये प्रमाणपत्र वितरणाच्या प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर स्वप्नपूर्तीच्या संचालिका निता माजगावकर युवा परिवर्तन च्या संचालिका वृषाली कोचरेकर भारतीय उद्योजकता विकास संस्थेचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय परुळेकर उपस्थित होते.
भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद व टाटा कम्युनिकेशन्स मुंबई द्वारा आयोजित रत्नागिरी येथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग व्यक्तींकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व, संभाषण कौशल्य, ग्राहक संबंध, उद्योग संधी, उद्योगाची निवड, मार्केट सर्वे, क्षेत्रभेट, व्यवसायाची हिशोब तपासणी, विपणन व्यवसायाचे व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, यशस्वी उद्योजकांसोबत संवाद इत्यादी विषयांचे तज्ञ मार्गदर्शकाच्या मतीने प्रशिक्षण निशुल्क स्वरूपाचे संपन्न झाले.
यामध्ये सहभागी होण्याकरिता 18 वर्षे पूर्ण ते 45 वर्षापर्यंत कमीत कमी सातवी उत्तीर्ण अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, एक फोटो, आदी झेरॉक्स कॉपी जोडाव्या लागतात. समाजातील या घटकांनी रोजगार निर्माण करून आत्मनिर्भर व्हावे हा उद्देश ठेवून भारतीय उद्योजकता विकास संस्था संपूर्ण रत्नागिरी मध्ये काम करत आहे. अशा प्रकारची प्रशिक्षण आयोजन करायची असल्यास दत्तात्रय परुळेकर, प्रकल्प अधिकारी भारतीय उद्योजकता विकास संस्था माळनाका मोबाईल नंबर 8261974636 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन इ.डी.आय.आय व टाटा कम्युनिकेशन द्वारे करण्यात आले आहे.