( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जिल्हा खनिकर्म विभागाने चिपळूण केतकी आणि करंबवणे- बहिरवली खाडीत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या सक्षन पंपावर कारवाई केली असली, तरी संगमेश्वर तालुक्यातील करजुवे माखजन परिसरात दिवस रात्र सक्षन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा सुरू असून असंख्य डंपर मधून विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू आहे. खनी कर्म विभाग आणि महसूल विभाग करजुवे खाडीत बेकायदा सुरू असणाऱ्या वाळू उपशावर कारवाई का करत नाही ? असा सवाल पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.
करजुवे येथील बेकायदा वाळू उपसा करण्यास कोणाचे अभय आहे ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. जिल्हा खनिकर्म विभागाने चिपळूण येथील केतकी आणि करंबवणे – बहिरवली खाडीत सक्षन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कारवाई केली. या कारवाईत केवळ दोन पंप फोडण्यात आले मात्र उर्वरित तेरा बोट चालक पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांच्यावर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जिल्हा खनिकर्म विभाग अथवा महसूल विभाग यांचा अशा प्रकारे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांवर अंकुश नसल्याने आणि संबंधित व्यावसायिकांना कारवाईची जरब बसत नसल्यानेच वारंवार बेकायदा वाळू उपसा करण्याचे प्रकार घडत आहेत.
▪️खाडीलगतची जमीन झाली सैल
करजुवे, माखजन अथवा केतकी चिपळूण या परिसरात गेली अनेक वर्षे शासनाचा लाखो आणि कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून शक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. या चोरट्या वाळू उपशाला राजकीय पाठबळ असल्याने महसूल विभागाचे अधिकारी अथवा खनी कर्म विभाग या चोरट्या वाळू उपशावर कारवाई करत नाही असा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. गेली अनेक वर्षे हा बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याने खाडीलगतची जमीन पोकळ झाली असून शेत जमिनीची माती खाडीत मोठ्या प्रमाणावर कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. वाळू उपसा , वृक्षतोड आणि खाण प्रकल्प यामुळे पर्यावरणाची कमालीची हानी होत असून आता जिल्हाधिकाऱ्यांनीच याची गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उचलावा अन्यथा आम्हाला कोकण आयुक्तांकडे दाद मागावी लागेल असे पर्यावरण प्रेमींनी नमूद केले आहे.