(संगमेश्वर)
निढळेवाडी (संगमेश्वर) येथील सहा वर्षीय श्रीशा अनुप पिंपरकर हिने राष्ट्रीय पातळीवर आपली उत्कृष्ट प्रतिभा दाखवत नॅशनल चिन्मय गीता फेस्ट 2025 स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेत उज्वल यश मिळाल्यानंतर श्रीशाची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली होती.
ही स्पर्धा २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी मुळशी (पुणे) येथे पार पडली. देशभरातील तब्बल १६ राज्यांमधील बालस्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, मध्यप्रदेश, आसाम, गोवा, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांतील प्रतिभावंत मुलांमधून श्रीशाने बाजी मारत आपले स्थान पक्के केले.
श्रीशाच्या या यशामुळे महाराष्ट्रासह निढळेवाडीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल झाले असून तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बालवयातच मिळवलेला हा राष्ट्रीय मान तिच्या भविष्याचा भक्कम पाया ठरेल, अशी सर्वांची भावना आहे.

