(संगमेश्वर)
तालुक्यातील मिऱ्या नागपूर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, कोंडगाव येथील दळवीवाडी वाणीवाडी येथे भुयारी मार्ग होणे आवश्यक असून, तो व्हावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काम करण्यास विरोध करण्यात आला. मात्र, याप्रकरणी नायब तहसीलदार सुदेश गोताड यांनी घटनास्थळी भेट देऊन सामोपचाराने ग्रामस्थांशी चर्चा केली. आता ग्रामस्थ पुढील चर्चा प्रांताधिकारी यांच्याशी करणार आहेत.
शुक्रवारी होणाऱ्या ग्रामसभेत हा विषय मांडून त्याबाबतचा ठराव केला जाणार आहे. त्यानंतर प्रांताधिकारी यांची भेट घेणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. जर भुयारी मार्ग नसेल तर शाळा, गुरे, गणपती विसर्जनस्थळ, दवाखाना, स्मशानभूमी या सर्व ठिकाणी जायचे कसे, असा प्रश्न आहे. भुयारी मार्ग होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी शासनस्तरावर लढा देण्याचे ठरवले आहे. यावेळी पुर्ये, तिवरे, मेढे, वाणीवाडी, दळवीवाडी येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. भुयारी मार्गासाठी ग्रामस्थ आक्रमक होते आणि त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम थांबवले.
आक्रमक झालेल्या ग्रामस्थांशी समजूत काढण्यासाठी नायब तहसीलदार सुदेश गोताड यांनी येथे भेट दिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी तलाठी आत्माराम मुरकुटे, महामार्ग प्रतिनिधी अनिल पाटील, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहायक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, पोलिस कॉन्स्टेबल नितीन बोन्डवे, प्रताप वाकरे, होमगार्ड पंकज शिवगण, शिवानी जाधव, प्राप्ती सुर्वे, संजोग साळवी, प्रशांत काटदरे उपस्थित होते.