(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील वनाज इंजिनियर्स लिमिटेड कंपनीत अज्ञातांनी सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. मात्र सुरक्षा रक्षकाच्या जागरूकतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी घाईघाईत पळ काढताना मागे सोडलेला पुरावा पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा ठरला. घटनेनंतर देवरूख पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून चार जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी विलास दामोदर पुरोहित (वय ७२, रा. सायले शिंदेवाडी, ता. संगमेश्वर) यांच्या तक्रारीवरून देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी अशी आहेत— शुभम संजय जोयशी (१८), रा. कोंडगाव जोयशीवाडी, दिपक सुभाष गुरव (३३), रा. बोंड्ये भेरेवाडी, आदित्य बळीराम भेरे (२४), रा. बोंड्ये भेरेवाडी, प्रदीप चंद्रकांत गुरव (२६), रा. बोंड्ये गुरववाडी. यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ नोव्हेंबरच्या रात्रीपासून १२ नोव्हेंबर सकाळी ७.४५ वाजेपर्यंतच्या वेळेत आरोपींनी कंपनीच्या भिंतीवरून खाली उतरून लोखंडी दरवाज्यातून आत प्रवेश केला. त्यांनी जंक्शन ब्लॉक, फोजिंग, ड्रम, कट अशा विविध प्रकारच्या एकूण १४ गोणत्यांमध्ये भरलेले अंदाजे १,३०७ स्पेअर पार्ट्स (किंमत ₹२,४५,०००) लंपास करण्याचा प्रयत्न केला. या गोणत्यांवर ‘दातार ट्रेडर्स साखरपा’ अशी ओळख असल्याने पोलिसांना चोरट्यांचा माग काढणे सुलभ झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चोरीचा मुद्देमाल (सुमारे ४६५ किलो) जप्त केला आणि चौघांना अटक केली.
पोलिसांची कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, सचिन पवार, अभिषेक वेलवणकर, आर्या वेलवणकर आणि सचिन लगारे यांच्या पथकाने आरोपींना पकडले. चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर करीत आहेत.

