( देवरूख / सुरेश सप्रे )
संगमेश्वर तालुका शिवसेना व युवासेना आयोजित युवासेना चषक २०२५ जिल्हास्तरीय फुटबॉल लीग स्पर्धेत युवराज स्पोर्ट्स देवरुख ने महापुरुष फायटर्स ला हरवत विजेतेपद पटकाविले. युवासेना चषक २०२५ जिल्हास्तरीय फुटबॉल लीग २४ व २५ ऑगस्ट रोजी पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन तालुक्याचे आम.शेखर निकम.यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई, लांजा-राजापूर मतदार संघाचे आम. किरण उर्फ भैयाशेठ सामंत, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत आस्था देवळे (संघमालक यश कोळवणकर) शुभम वॉरियर्स (संघमालक वैभव पवार) शिव गर्जना फायटर्स (संघमालक राजू सावंत) सह्याद्री नगर वॉरियर्स (संघमालक बंधु सुर्वे) महापुरुष फायटर्स (संघमालक अभिजित सप्रे, युवराज स्पोर्ट्स ( संघमालक बाबू मोरे) या संघांनी भाग घेतला होता.
या सर्व संघात झालेल्या अतीशय चुरशीच्या लढतीनां प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. या स्पर्धेतील अंतिम सामना युवराज स्पोर्ट्स आणि महापुरुष फायटर्स यांच्यात झालेल्या लढतीत युवराज स्पोर्ट्स संघाने चतुरस्र खेळ करत विजेतेपदावर नाव कोरत युवासेना चषक पटकावला. महापुरुष फायटर्स संघ उपविजेता ठरला, तर सह्याद्री नगर वॉरियर्स संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
ग्रामीण भागात क्रीडासंस्कृती रुजवण्याच्या प्रयत्न कौतुकास्पद असून खेळाडूंना नवे बळ मिळते असे आम. किरण सामंत यांनी सांगत तालुका युवासेनेच्या कार्यकर्तेंचे कौतुक केले. तालुक्यात युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी असेच विविध उपक्रम भविष्यात राबवले जातील असे शिवसेना युवानेते व आयोजक रोहन बने यांनी सांगितले. मान्यवरांचे व स्पर्धेला सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार सिद्धेश सुर्वे यांनी मानले.

