(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस–जाकादेवी मुख्य मार्गावर ट्रक खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. गोव्याहून वसईकडे MH48C/B1930 क्रमांकाचा ट्रक घेऊन निघालेला चालक तय्यब हुसेन खान हा गुगल मॅपच्या मदतीने जाकादेवी–फुणगूस मार्गाने प्रवास करत असताना, चढ-उतार व अवघड वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक वीस ते पंचवीस फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची भीषणता पाहता चालकाचे नशीब बलवत्तर असल्याचे म्हणावे लागेल.
मुंबई–गोवा महामार्गावरील निवळी फाट्यापासून मुंबईकडे जाताना, गुगल मॅप काहीवेळा राष्ट्रीय महामार्ग न दाखवता निवळी–जयगड मुख्य मार्ग व त्यानंतर जाकादेवी–फुणगूस मार्ग दाखवत असल्याने वाहनचालकांची फसगत होत आहे. परिणामी या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच गुगल मॅपद्वारे याच रस्त्यावरून गेलेल्या एका वाहनाचा फुणगूस येथील वळणावर अपघात झाला होता. तसेच, फक्त चार दिवसांपूर्वी गोव्याहून मुंबईकडे रासायनिक द्रव्याने भरलेला आयशर टेम्पो जात असताना ह्याच वळणावर तो दरीत कोसळला होता.
आज पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाला. तय्यब हुसेन खान हा आपल्या ताब्यातील MH48C/B1930 क्रमांकाच्या ट्रकमधून सुमारे सात टन पार्ले-जी पेपर रॅपर रोल घेऊन निघाला होता. गुगल मॅपने दाखवलेल्या जाकादेवी–फुणगूस मार्गाने तो मुंबईकडे जात असताना, फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील अवघड वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटले. परिणामी ट्रक पलटी होऊन वीस ते पंचवीस फूट खोल दरीत कोसळला.
अपघाताचा आवाज होताच पोलीस पाटील प्रशांत ऊर्फ नान्या थूळ, स्थानिक रिक्षा व्यवसायिक आणि ग्रामस्थांनी धाव घेतली. गाडीच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताची भीषणता पाहता चालकाचे नशीब बलवत्तर असल्याचे ग्रामस्थ म्हणत होते. ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती पोलीस पाटील प्रशांत (नान्या) थूळ यांनी डिंगणी पोलिसांना दिली.