(संगमेश्ववर / एजाज पटेल)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत फुणगूस येथील एका 90 वर्षांच्या आजोबांनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्ववर तालुक्यात येणाऱ्या फुणगूस या खेडेगावातील डोंगरदरीत वसलेल्या कांबळे वाडीतील 90 वर्षीय वयोवृद्ध आजोबांनी मतदान करून नवमतदारांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. बाळू गणू कांबळे(वय 90 वर्षे ) असे या आजोबांचे नाव आहे. तब्येतीने थकलेल्या आजोबांना व्यवस्थित चालता येत नसल्याने फुणगूस गावचे माजी सरपंच तसेच सामाजिक क्षेत्रात वावरणारे रश्मीकांत उर्फ बिपीन देसाई यांनी त्यांना वाहनाने येथील केंद्रापर्यंत आणण्याचे काम केले. तर बाळू कांबळे यांनी वृद्धपकाळातही प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. 90 वर्षीय बाळू आजोबांचा मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी 90 वर्षांच्या बाळू आजोबांचा हा उत्साह आदर्शवत होता.
भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र, काही मतदारांनी मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला. अशा मतदारांनी 20 तारखेला बुधवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यात फुणगूस कांबळे वाडी येथील बाळू गणू कांबळे या आजोबांचा देखील समावेश होता. लोकशाहीच्या उत्सवात तब्बल 90वर्षीय वय असलेल्या या बाळू आजोबानी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला. एवढेच नव्हेतर त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील या निमित्ताने केले होते.