(संगमेश्वर)
पत्नीपासून घटस्फोट घेतल्याच्या मानसिक तणावाखाली संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथील एका ४२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. संतोष विठोबा जागुष्टे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता तुरवटे-ओझरे परिसरातील एका खणीतील पाण्यात आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. या कौटुंबिक कलहामुळे तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. घरच्यांना कामावर जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला, मात्र त्याने थेट खणीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले.
स्थानिक नागरिकांना मृतदेह पाण्यात तरंगताना दिसताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ.क्र. २७/२०२५) करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे ओझरे खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

