(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक ११ येथील पंचशील नगर विहारात वर्षावास सांगता समारंभ मुंबई येथील भन्ते पूज्य करूणा ज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी शिक्षण विस्तार अधिकारी व शाखेचे विद्यमान अध्यक्ष अनिल गोविंद पवार यांनी भूषविले. यावेळी रत्नागिरी तालुका बौध्दजन पंचायत समिती रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सचिव सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, माजी तालुकाध्यक्ष व दानशूर व्यक्तिमत्व तु.गो. सावंत, ज्येष्ठ कार्यकर्ते विलास कांबळे, मुंबई कमिटीचे अध्यक्ष विजय पवार, सचिव मिलिंद पवार, ऑडिटर अनंत पवार, कोषाध्यक्ष विद्याधर पवार माजी अध्यक्ष गोविंद पवार, मुंबई शाखेचे महेंद्र पवार, स्थानिक शाखेचे उपाध्यक्ष संदिप पवार, सचिव सुभाष पवार, महिला मंडळाच्या अध्यक्षा नलिनी पवार, उपाध्यक्षा संपदा पवार, सचिव रीना पवार, सहसचिव करूणा पवार, सभापती नम्रता पवार यांसह परिसरातील बौद्धाचार्य श्रामणेर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम पूज्य भंते करुणा ज्योती महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.पूज्य भन्ते करुणा ज्योती महथेरो यांनी वर्षावासाचे महत्त्व विशद करून भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग विशेद केले. भगवान बुद्धांनी कठीण ध्यानसाधना, घनघोर तपस्या करून मानवी जीवनासाठी सुखा-समाधानाचा वैज्ञानिक धम्म दिला. त्या धम्माचे आचरण करून आपण आपले आयुष्य सुखमय व आनंदी करावे, भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या पंचशीलचे पालन करून आपण कोणत्याही वाईट गोष्टीला बळी पडू नये, यासाठी प्रत्येकाने दररोज पंचशीलेचे पठण करून अर्थ समजून घेऊन तो अंगिकरावा, असे आवाहन केले. भगवान गौतम बुद्ध यांनी मानवासह सृष्टीतील सर्व प्राणी मात्रांवर प्रेम केले. भगवान गौतम बुद्ध हे जगातील पहिले सर्पमित्र म्हणूनही त्यांनी आवर्जून उल्लेख करून भगवान गौतम बुद्धांची समान दृष्टी आकाशाएवढी व्यापक होती असे अधोरेखित करत चांगल्या मैत्रीमुळे आपले जीवन सफलदायी ठरू शकते. चांगल्या मैत्रीचा अवलंब करावा, अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे, अनिष्ट चालीरीती यांचा त्याग केला पाहिजे, आपले मार्गदाते आणि आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने आपले कुटुंब, समाज आणि देश पुढे नेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पूज्य भन्ते करुणाज्योती महाथेरो यांनी केले.
यावेळी कळझोंडी शाखेतील कालकथित बौद्धाचार्य गोविंद महादेव उर्फ जी.एम. पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र अनिल गोविंद पवार यांच्या सौजन्याने तालुक्यातील बौद्धाचार्य यांना सन्मानपत्र व पुष्प देऊन त्यांचा व पूज्य भंते महाथेरो यांचा विशेष गौरव केला.
पूज्य भन्ते व मान्यवर यांचे स्वागत तालुका शाखा संस्कार समिती व स्थानिक व मुंबई कमिटीच्या वतीने करण्यात आले. यावेळी सदरचा कार्यक्रम तालुका अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी उपाध्यक्ष विजय आयरे यांनी वर्षावास कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केल्याबद्दल कळझोंडी शाखेला मनःपूर्वक धन्यवाद देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक संतोष पवार यांनी केले, तर आभार सल्लागार किशोर पवार यांनी मानले.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक व मुंबई शाखा तसेच तालुका शाखा यांचे बहुमोल योगदान मिळाले.