(चिपळूण)
तळकोकणात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यातच जिल्ह्यातील चिपळूण शहरात रक्ताच्या थारोळ्यात तरुण सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बहादूरशेख परिसरात रविवारी (दि. 8) सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावरील खोल जमखांवरून या तरुणाचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत व्यक्तीचे नाव हमीद शेख असून तो मूळचा कराडचा असून सध्या तो चिपळूणमध्ये राहत होता.
तरुणाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने हे घटनास्थळी दाखल झाले होते. ज्या युवकाचा खून झाला. तो चिपळूण कावीळतळी परिसरात नातेवाईकांकडे वास्तव्यास होता. हमीद हा अंडरआर्मचा उत्तम क्रिकेटर होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन लागले होते. पेट्रोल चोरीसारखे गुन्हे देखील दाखल झाले होते. यामुळे तो भुरटा चोरटा म्हणून परिचित होता. मूळचा तो कराड येथील असून त्याची आई कुवेत येथे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. सलमा करीम लतीफ शेख (64, रा. काविळतळी, शिवशक्ती अपार्टमेंट चिपळूण) यांनी फिर्याद दिली.
जिल्ह्याला हादरवून टाकणारा संपूर्ण प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका या गजबजलेल्या भागात हमीद शेख नावाच्या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने आनंदाच्या उत्सवात चिपळूण हादरलं आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत काही तासातच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांत नीलेश आनंद जाधव (वय 30, वडार कॉलनी चिपळूण) व अन्य एक अल्पवयीनचा (17) समावेश आहे.
या संशयितांकडे चौकशी केली असता संबंधितांकडून रात्री दीड ते दोनच्या सुमारास संशयित आरोपी घटनास्थळावरुन जात होते. यावेळी हमीद शेखही तेथे होता. त्यावेळी संशयित व शेख यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि हाणामारीवर आला. संशयित आरोपींनी त्या फरशी उचलून शेख याच्या डोक्यात मारली व नंतर दगड उचलून डोक्यात घातला. यामुळे तो तरूण जागेवरच मृत झाल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले.