(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पाटगाव कुंभारवाडी येथील गणेश दशरथ साळवी यांनी ‘बेटी बचावो बेटी पढाओ’ या संकल्पनेवर आधारित सामाजिक संदेश देणारा आकर्षक देखावा घरगुती गणेश उत्सवानिमित्त साकारल्याने तालुक्यात कौतुक होत आहे.
स्त्रीभ्रूणहत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता हा देखावा समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. मुलगी वाचून शिकवण्यापर्यंतचे काही संदेश या देखाव्यातून देण्यात आले आहेत. स्त्रीभ्रूण हत्या हा कायद्याने गुन्हा आहे. तरीसुद्धा स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढत आहे. मात्र स्त्रीभ्रूण हत्या केल्यानंतर डॉक्टर सहित मुलीच्या बापाला सुद्धा जेलची हवा खावी लागते याचे उत्तम चलचित्र देखाव्यातून साकारण्यात आले आहे.
तसेच राजमाता जिजाऊ पासून तर विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुरमू व ऑलिंपिक विजेती मनू भाकर पर्यंत भारतातील कर्तबगार स्त्रियांचा आलेख या देखाव्या मध्ये मांडण्यात आला आहे. स्त्री ही घरची लक्ष्मी आहे तिचे महत्व मांडणारा व सामाजिक संदेश देणारा हा देखावा तालुक्यात आकर्षण ठरत आहे. यासाठी गणेश दशरथ साळवी त्यांची पत्नी स्नेहा गणेश साळवी तसेच त्यांचे वडील दशरथ साळवी व आई अनिता साळवी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.