(खेड / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे ट्रक आणि रिक्षाचा अपघात होऊन रिक्षाचालक जखमी झाला. महामार्गावरून सर्व्हिस रोडवर येत असताना पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून आलेल्या भरधाव रिक्षाने धडक दिली. या अपघातात अख्तर मापकर (रा. अलसुरे मोहल्ला) जखमी झाले असून, रिक्षाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले. जखमी रिक्षाचालक अख्तर मापकर यांना उपचारासाठी धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघातात सहभागी असलेल्या रिक्षाचा क्रमांक MH 08 BC 1334, तर ट्रकचा क्रमांक MH 12 MV 5224 असा आहे. या घटनेमुळे भरणे नाका परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. महामार्गावरून सर्व्हिस रोडवर येणाऱ्या वाहनांची काही काळ कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागला.
भरणे नाका परिसरात महामार्गावरून सर्व्हिस रोडवर येणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


