(खेड / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या खवटी येथील भारतवाडी परिसरात बंद घराला लक्ष्य करून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. दरवाजाचे कुलूप हातोड्यासारख्या हत्याराने तोडून घरात प्रवेश केलेल्या चोरट्याने बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेतील सोन्याची चैन आणि रोख रक्कम असा एकूण ६० हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खवटी भारतवाडी येथील रहिवासी चंद्रकांत श्रीधर दळवी हे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप हातोड्यासारख्या हत्याराने तोडले आणि घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्याने बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेची झडती घेतली. या बॅगेत असलेली १२.५० ग्रॅम वजनाची वापरती सोन्याची चैन, किंमत ५९ हजार ५०० रुपये, तसेच १ हजार २५० रुपये रोख असा एकूण ६० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रकांत दळवी यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२०२६ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१६ वाजता करण्यात आली. घरफोडीसाठी वापरण्यात आलेले हत्यार, चोरट्याने घरात प्रवेश केलेली पद्धत तसेच चोरीनंतर त्याने कोणत्या दिशेने पलायन केले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान खेड पोलिसांसमोर आहे.

