(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी असलेला भुयारी मार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला असला, तरी येथील विद्युत पुरवठ्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने भुयारी मार्गातील प्रकाशव्यवस्था आणि व्हेंटिलेशन बंद पडत आहे. परिणामी, वाहनचालकांना अनेकदा अंधार आणि कोंदट वातावरणातून प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे महामार्ग बांधकाम विभाग प्रशासनासह पोटठेकेदार कंपनी ‘एसडीपीएल’ एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
कशेडी घाटातील तीव्र वळणे आणि धोकादायक प्रवासापासून वाहनचालक व प्रवाशांना दिलासा मिळावा, प्रवासाचा वेळ कमी व्हावा आणि अपघातांतील मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, एकमेकांना समांतर असलेल्या दोन्ही भुयारी मार्गांमध्ये प्रकाशव्यवस्था, व्हेंटिलेशनसह विविध सुरक्षा यंत्रणा सुरळीत सुरू नसल्याचे प्रवासादरम्यान निदर्शनास येत आहे.
विशेषतः खेड दिशेकडील दुसऱ्या समांतर भुयारात प्रवेशद्वारापासून मध्यभाग आणि त्यापुढील आतील बाजूला प्रकाशव्यवस्था बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा आतील भाग केवळ वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे दिसत होता. त्यातच छताकडील कातळातून संततधार पाणी कोसळल्याने रस्ता ओला झाला होता. अशा परिस्थितीत अपुऱ्या प्रकाशामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कशेडी येथील हे दोन्ही भुयारी मार्ग साधारणपणे दोन किलोमीटर लांबीचे आहेत. भुयारातील प्रकाशव्यवस्था तसेच प्रभावी वायुवीजन व्यवस्था सुरू राहण्यासाठी महावितरणचा विद्युत पुरवठा सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोटठेकेदार कंपनी ‘एसडीपीएल’चे अमोल शिवतारे यांना तातडीची विद्युत पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार खासगी इमर्जन्सी पॉवर स्टेशन सुरू करण्यात आले. मात्र, या पॉवर स्टेशनमध्ये वारंवार नादुरुस्ती होत असल्याने तसेच फ्लड लाइट्स आणि व्हेंटिलेशनसाठी पुरेसा विद्युत पुरवठा उपलब्ध होत नसल्याने या सुविधा बंद पडत आहेत. परिणामी, भुयारी मार्गातील ‘काळोख आणि कोंदटपणा’ कायम असल्याचे चित्र आहे.
भुयारी मार्गाच्या आतील भागाप्रमाणेच प्रवेशद्वारांच्या परिसरातील आणि बाहेरील सुमारे अर्धा किलोमीटर महामार्गावरील स्ट्रीट लाईटदेखील बंद आहेत. या परिसरातील काही मोजके स्ट्रीट लाईट वगळता जवळपास सर्वच दिवे बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा परिसरही अंधारमय झाला आहे.
गणेशोत्सवानंतर दोन, पाच आणि अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होत आहे. कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत परतीच्या प्रवासातील गर्दी कमी असली, तरी मोठ्या प्रमाणावर वाहतूक या भुयारी मार्गातून होणार आहे. त्यामुळे भुयारी मार्गातील प्रकाशव्यवस्था आणि व्हेंटिलेशन सुरळीत ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, भुयारातील ‘काळोख आणि कोंदटपणा’ चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात घातक ठरण्याची शक्यता प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.


