(रत्नागिरी /प्रतिनिधी )
प्रशासकीय दिरंगाई आणि वीजजोडणीच्या नावाखाली ग्राहकांची होणारी ससेहोलपट पुन्हा एकदा जीवघेण्या वळणावर पोहोचली आहे. वीजजोडणीला होणाऱ्या विलंबाचा संताप अनावर झाल्याने एका ग्राहकाने थेट महावितरणच्या जाकादेवी (चाफे) शाखा कार्यालयात धुडगूस घालत सहाय्यक अभियंत्यावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकीकडे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला असतानाच, दुसरीकडे ‘महावितरण’च्या संथ कारभाराचे वाभाडेही काढले आहेत.
जाकादेवी येथील आर.ओ. प्लांटसाठी असलेले चार किलोवॅटचे कनेक्शन बदलून नऊ किलोवॅटचा ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा मिळावा, यासाठी चिंचवाडी (मांजरे, ता. संगमेश्वर) येथील प्रसाद गजानन देसाई (वय ४१) याने २४ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. मात्र, नेहमीच्याच लालफितीच्या कारभारामुळे ही प्रक्रिया रखडली. चार दिवस उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने देसाई याचा संयम सुटला. गुरुवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी देसाई याने सहाय्यक अभियंता राजेंद्र शंकर पवार (वय ४४) यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून ‘संपवण्याची’ धमकी दिली. दुपारी पावणेचारच्या सुमारास त्याने थेट जाकादेवी शाखा कार्यालय गाठले. कार्यालयात शिरताच त्याने पवार यांना ‘जागीच ठार करतो’ अशी धमकी देत सरकारी लॅपटॉपची नासधूस केली. संतापाच्या भरात त्याने दुचाकीतून आणलेला चाकू काढून पवार यांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने आणि तेथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. तरीही संशयित आरोपीने पाठलाग करत ‘तुरुंगातून सुटल्यावरही जिवंत सोडणार नाही,’ अशी गर्जना केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदा हातात घेऊन कर्मचाऱ्याच्या जीवावर उठणे आणि सरकारी मालमत्तेची तोडफोड करणे हे कोणत्याही सुसंस्कृत समाजात समर्थनीय ठरू शकत नाही; मात्र या उद्रेकामागील ‘महावितरण’च्या कारभाराची बाजूही तितकीच गंभीर आहे. वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ग्राहकावर शस्त्र उगारण्याची वेळ का यावी? ग्राहकांच्या अर्जावर नेमक्या किती दिवसांत कार्यवाही होणे अपेक्षित आहे? संबंधित अर्जात काही तांत्रिक त्रुटी होत्या का? आणि असतील, तर त्या ग्राहकाला लेखी स्वरूपात का कळवल्या गेल्या नाहीत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देणे आता गरजेचे आहे.
अधिकाऱ्याच्या मागील कारभाराची चर्चा
या घटनेनंतर आता संबंधित सहाय्यक अभियंत्याच्या एकूणच कार्यपद्धतीवर परिसरातून जोरदार चर्चा असून, जुन्या तक्रारींनाही पुन्हा तोंड फुटले आहे. यापूर्वीही नवीन वीज मीटर बसवणे, नादुरुस्त मीटर बदलणे आणि वीजजोडणी देण्याबाबत या अधिकाऱ्याविरोधात ग्राहकांच्या काही तोंडी तक्रारी दबक्या आवाजात होत्या. त्या तक्रारी आता उघडपणे चर्चेत येऊ लागल्या आहेत. अगदी मुंबईत राहणाऱ्या ग्राहकाला सुद्धा किरकोळ तांत्रिक कारणे सांगून कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावणे, अर्जांचा निपटारा करण्यास विलंब करणे आणि ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे, अशीच कार्यशैली या परिसरात रूढ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.


