(मुंबई / प्रतिनिधी)
प्राचीन बौद्ध लेणी, ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे मुंबईस्थित रत्नागिरी तालुक्यातील सैतावडे गावचे सुपुत्र, लेणी अभ्यासक, इतिहास अभ्यासक, लेखक आणि धम्म (ब्राह्मी) लिपीचे शिक्षक राकेश सदानंद पवार यांना ‘कर्तृत्व गौरव सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ओरा इव्हेंट्स संस्थेच्या वतीने 24 नोव्हेंबर 2026 रोजी मीरा रोड येथील लता मंगेशकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या लेणी संवर्धन आणि अभ्यासविषयक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी आमची एकजूट समूह टीम, मित्रपरिवारातील सारिश (दादूस) डोळस, खंडेश बगाटे, पूजा कसबे, संदीप कांबळे, शुभम डोळस, नम्रता मनोज पोतदार, अतुल पवार तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘महामाता रमाई’चे लेखक नथुराम जाधव (पुणे) उपस्थित होते.
राकेश पवार गेल्या अनेक वर्षांपासून प्राचीन बौद्ध लेणी, त्यांमधील शिल्पकला, स्थापत्यशैली, शिलालेख आणि बौद्ध सांस्कृतिक वारसा यांचा सखोल अभ्यास करीत आहेत. महाराष्ट्रातील परिचित आणि अपरिचित अशा विविध लेण्यांना भेटी देऊन त्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या माध्यमातून संशोधन व अभ्यास केला आहे. ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूहा’च्या माध्यमातून आयोजित विविध अभ्यास दौऱ्यांमध्ये सहभागी होत त्यांनी आतापर्यंत 80 लेणी अभ्यास दौरे पूर्ण केले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून लेण्यांचा इतिहास, स्थापत्यकला, शिल्पवैभव आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊन त्यासंबंधीची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत.
प्राचीन लेण्यांचा इतिहास आणि बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा सर्वसामान्यांना समजावा, या उद्देशाने ते वृत्तपत्रांसह विविध माध्यमांतून नियमित लेखन करतात. ‘लेणी – शिला संवाद’ या संकल्पनेतून लेणी अभ्यास, ऐतिहासिक वारशाचे महत्त्व आणि लेणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
लेणी म्हणजे केवळ दगडात कोरलेल्या वास्तू नव्हेत, तर प्राचीन भारतीय इतिहास, बौद्ध संस्कृती, तत्कालीन समाजजीवन आणि कलावैभव यांचा अमूल्य ऐतिहासिक दस्तऐवज आहे. हा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावा आणि त्याचे महत्त्व समाजाला समजावे, यासाठी राकेश पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत.
‘कर्तृत्व गौरव सन्मान’ पुरस्कारामुळे त्यांच्या लेणी अभ्यास, ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धनविषयक कार्याचा गौरव झाला आहे. भविष्यातही महाराष्ट्रातील बौद्ध लेणी, शिल्पकला, शिलालेख आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करून हा अमूल्य ठेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार राकेश पवार यांनी व्यक्त केला.


