पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंदार किवळे याच्यावर सहा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत विविध पथके रवाना केली. अवघ्या दीड तासात सहा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. जखमी मंदार किवळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मंदार किवळे न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयात आला होता. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या पार्किंगजवळ तो रस्त्यावर उभा असताना दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. आरोपींनी दोन पिस्तुलांतून त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, एका पिस्तुलातून गोळी न सुटल्याने त्याचे मॅगझीन रस्त्यावर पडले. दुसऱ्या पिस्तुलातून झाडलेली गोळी मंदारच्या पाठीला चाटून गेली. यानंतर त्याच्यावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यामागे आंबेगाव येथील शुभम चव्हाण याच्या खुनाचा बदला घेण्याची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी शुभम चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणात मंदार किवळे आरोपी होता. तो १८ नोव्हेंबर रोजी जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. जामिनावर सुटल्यानंतर न्यायालयीन कामासाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला असताना शुभमचा भाऊ अक्षय चव्हाण याने बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात अक्षय चव्हाण याच्यासह बाब्या पवार, यणप्पा, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, अमोल रामचंद्र चव्हाण आणि गणेश सुभाष चव्हाण अशी सात आरोपींची नावे समोर आली आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तातडीने विविध पथकांच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू केला. आरोपी पळून जात असताना दौंड येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. काही संशयितांना डेक्कन परिसरातून, तर काहींना आंबेगाव पठार आणि दौंड येथून पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच तपासासाठी विविध पोलीस पथके रवाना करण्यात आली आणि दीड तासाच्या आत संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आतापर्यंत एकूण सहा जणांना ताब्यात घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालय परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा ऑडिट करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. मंदार हा यापूर्वी एका गुन्ह्यात आरोपी होता. या हल्ल्यात समोरच्या आरोपींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदारच्या शरीरावर गोळी लागल्याची निशाणी दिसत नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.


