(पंढरपूर / वृत्तसंस्था)
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेच्या धार्मिक सोहळ्याचा समारोप बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी पारंपरिक महाद्वार काला उत्सवाने झाला. विठ्ठल सभामंडपात आयोजित या सोहळ्यात हरिदास, नामदास महाराज, पुजारी आणि विविध समाजबांधवांनी सहभागी होत विठुरायाच्या नामघोषात उत्सव साजरा केला. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या पारंपरिक विधीला विठ्ठल सभामंडपातून सुरुवात झाली. यावेळी सभामंडपात पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर दहीहंडी फोडून काल्याचा उत्सव साजरा करण्यात आला. पुढे नामदेव पायरीमार्गे काल्याचे महाद्वाराकडे प्रस्थान झाले. या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
कार्तिकी यात्रेच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि पारंपरिक प्रथा-परंपरांचे मंदिर समितीच्या वतीने काटेकोरपणे पालन करण्यात आले. यात्रेतील सर्व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभागप्रमुख संदीप कुलकर्णी यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, कार्तिकी यात्रेची सांगता झाल्यानंतर शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा पारंपरिक धार्मिक विधीनुसार संपन्न होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.


