(पनवेल)
महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकावर आणि त्याच्या आईवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित उपनिरीक्षकाची ओळख पीडित महिलेसोबत मार्च २०२० मध्ये, तो तळोजा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना झाली होती.
मैत्रीच्या आधारे विश्वास संपादन करत त्याने तिला नेरे येथील महालक्ष्मीनगरमधील भावाच्या घरात चहा पिण्याच्या बहाण्याने नेले. चहात गुंगीकारक औषध टाकून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी अर्धनग्न स्थितीत तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याशिवाय तक्रार केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली.
त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२५ या कालावधीत करंजाडे येथील तिच्या राहत्या ठिकाणी वारंवार अत्याचार केला. याच दरम्यान, चारचाकी वाहन खरेदीसाठी तिला पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास तिचे अर्धनग्न फोटो तिच्या मुलाला दाखवण्याची धमकी दिली. पीडितेकडून दोन लाख रुपये ऑनलाईन व तीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या काळात आरोपी उपनिरीक्षकाने तिला जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक छळ केला. जेव्हा पीडितेने ही बाब आरोपीच्या आईला सांगितली, तेव्हा तिनेही जातीवरून अपमानकारक शब्द वापरले. त्यामुळे दोघांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.