(रत्नागिरी / वार्ताहर)
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने मारुती मंदिर सर्कल येथील शिवतीर्थावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समस्त रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत १,५५१ दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केल्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी शिवमंदिरांमध्ये दीप प्रज्वलित केल्याने भगवान शंकरांची कृपादृष्टी लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील लाखो शिवमंदिरांमध्ये या दिवशी दीपप्रज्वलन केले जाते.
याच धार्मिक भावनेतून आणि ‘जिथे छत्रपती शिवाजी महाराज, तिथे शिवमंदिर’ ही भावना मनात ठेवून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून शिवरायांच्या चरणी दीप अर्पण करण्यासोबतच राष्ट्रप्रेमाची भावना प्रज्वलित करणे, अंधारातून चैतन्य निर्माण करणे आणि हिंदू समाजाला एकात्मतेचा संदेश देण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला.


