(मुंबई)
राज्यसभेच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राज्याच्या राजकारणातील सस्पेंस अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असताना अखेर पक्षाने मोठा निर्णय घेत राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे छगन भुजबळांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत घोषणा केली. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींसमोर एक महत्त्वाची अट ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “आधी समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या, त्यानंतरच उमेदवारी अर्ज भरणार,” अशी भूमिका भुजबळांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. याच अटीमुळे पक्षाने त्यांना वेटिंगवर ठेवले आणि अखेर दुसऱ्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा रंगली आहे.
“राजेंद्र जैन यांनी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून तब्बल 12 वर्षे विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक, फेडरेशनसह विविध संस्थांमध्ये त्यांनी दीर्घकाळ प्रभावीपणे काम केले आहे. विदर्भाला पक्षाकडून प्रतिनिधित्व देण्याचा विचार अनेक दिवसांपासून सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने एकमताने राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छूक होते. मात्र, त्यांच्या जागी समीर भुजबळ यांना संधी देण्याची मागणी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली होती. यासाठी छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
भुजबळांनी पक्षातील इतर नेत्यांच्या कुटुंबीयांचे उदाहरण देत आपली भूमिका स्पष्ट केली होती. “दादांचे कुटुंब, तटकरेंच्या कुटुंबाला जो न्याय मिळतो, तो भुजबळ कुटुंबाला का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच काही कुटुंबातील एक सदस्य केंद्रात तर दुसरा राज्य मंत्रिमंडळात असल्याचे उदाहरणही त्यांनी दिले होते.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी दोन दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या राज्यसभा प्रवेशाच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यातून नवनीत राणा यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट करत सुनील तटकरे यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला.
राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचे नाव जाहीर होताच त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली पहिली प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय. स्व. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन वेळा विधान परिषदेवर निवडुन आलो. एक वेळ मी पडलो. गोंदिया मध्यवर्ती जिल्हा सहकारी बॅकेत मी 19 वर्षापासून मी अध्यक्ष आहे,अशी त्यांनी आपली ओळख सांगितली. माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे. सुनेत्रा पवार यांनी जो विश्वास दाखवला आहे, तो मी खरा करणार,असे राजेंद्र जैन म्हणाले. तसेच मी विदर्भात चांगल्या पद्धतीने काम करून अजितदादांचे जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी आजपर्यत पक्षाचा इमानदार कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्या पद्धतीनेच काम करणार आणि एका सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवणार, असे शेवटी राजेंद्र जैन म्हणाले.
राज्यसभा उमेदवारीच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आगामी काळात छगन भुजबळ यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

