(मुंबई / वृत्तसंस्था)
जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना जात पडताळणी समितीच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज आता राहणार नाही. राज्य सरकारने जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे वैधता प्रमाणपत्रासाठी केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्यापासून कागदपत्रांची छाननी, सुनावणी आणि अंतिम प्रमाणपत्र मिळविण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहेत. विशेष म्हणजे, अर्जदाराला त्याचे प्रमाणपत्र ई-मेल आणि व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करून दिले जाणार आहे. जात पडताळणी समितीने शक्यतो अर्ज प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या सहकार्याने ‘कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (CCVIS) ही डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे अर्ज दाखल करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची सद्यस्थिती जाणून घेणे आणि वैधता प्रमाणपत्र मिळविणे या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
नव्या व्यवस्थेनुसार ऑफलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदाराला आवश्यक दस्तऐवजी पुरावे, मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे तसेच शपथपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करावी लागतील. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत काढून जात पडताळणी समितीच्या कार्यालयात पुन्हा जमा करण्याचीही आवश्यकता राहणार नाही.
अर्जदाराचा अर्ज आधार क्रमांकाशी जोडला जाणार असल्याने प्रत्येक व्यक्तीला केवळ एकच अर्ज दाखल करता येईल. अर्जासोबत जातीच्या नोंदीचा आणि निर्धारित मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा देणे बंधनकारक असेल. संबंधित पुरावा उपलब्ध नसल्यास अर्जदाराला स्वयंघोषणापत्र सादर करण्याची मुभा असेल. तथापि, प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार जात पडताळणी समिती अतिरिक्त कागदपत्रे किंवा पुरावे मागवू शकते.
ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम लिपिकाकडून अपलोड केलेल्या कागदपत्रांची तांत्रिक तपासणी केली जाईल. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी अर्ज संबंधित व्यक्तीकडे परत पाठविला जाईल. त्यानंतर सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, समितीचे अध्यक्ष आणि सदस्य उपलब्ध पुराव्यांची गुणात्मक पडताळणी करून निर्णय घेतील. जातीचा दावा योग्य असल्याचे सिद्ध झाल्यास डिजिटल स्वाक्षरीसह वैधता प्रमाणपत्र जारी केले जाईल.
या प्रक्रियेत अर्जदाराला मार्गदर्शन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्जाची स्थिती तपासण्याबरोबरच अर्जातील त्रुटी किंवा आवश्यक पूर्ततेसंदर्भातील माहिती एसएमएस, व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. सुनावणीची आवश्यकता भासल्यास अर्जदाराला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपली बाजू मांडता येणार आहे. केवळ विशिष्ट आणि अपवादात्मक प्रकरणांमध्ये बार्टीच्या महासंचालकांच्या परवानगीने प्रत्यक्ष सुनावणी घेता येईल.
अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी अर्जदाराला पुढील दोन महिने ऑनलाइन माध्यमातून सूचना दिल्या जातील. पाचव्या महिन्यातही त्रुटींची पूर्तता करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम सुनावणीची संधी दिली जाईल. त्यानंतरही अर्जदाराने प्रतिसाद दिला नाही किंवा आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर संबंधित प्रकरण निकाली काढण्यात येणार आहे.
अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांबाबत समितीला शंका असल्यास संबंधित प्रकरण दक्षता पथकाकडे चौकशीसाठी पाठविण्याची तरतूद आहे. आवश्यकतेनुसार अर्जदाराला कारणे दाखवा नोटीसही बजावली जाऊ शकते. मात्र, अर्जदाराला आपली बाजू मांडण्यासाठी वाजवी संधी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची संधी दिल्याशिवाय जातीचा दावा अवैध ठरविता येणार नाही. दावा अवैध ठरविण्याचा निर्णय घेतल्यास समितीला त्यामागील कारणे नमूद करून आदेश जारी करावा लागेल.
दरम्यान, जात वैधता प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कातही राज्य सरकारने सुधारणा केली आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५०० रुपये, तर महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी १,००० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नोकरी आणि सेवाविषयक प्रयोजनांसाठीही १,००० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शासकीय योजनांचा लाभ आणि सवलती मिळविण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यास त्यासाठीही १,००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
नवीन ऑनलाइन प्रणाली https://www.cvc.barti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विविध शासकीय योजना आणि सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया या प्रणालीमुळे अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थी, नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार, निवडणूक लढविण्यास इच्छुक व्यक्ती आणि अन्य नागरिकांना या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेता येणार आहे.


