(ठाणे / भिवंडी)
उपचारादरम्यान ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात भिवंडीतील ओस्वालवाडी येथील नोबल हॉस्पिटलवर अखेर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपांनंतर डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयाला सील केले. नितीन वाघमारे यांच्या मृत्यूप्रकरणी मृताच्या कुटुंबीयांकडून आणि आंबेडकरी युवा संघटनेकडून सातत्याने कारवाईची मागणी केली जात होती.
नितीन विश्वनाथ वाघमारे यांना १८ एप्रिल २०२६ रोजी छातीत दुखू लागल्याने ओस्वालवाडी परिसरातील नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आफान खान यांनी टू-डी इको आणि अँजिओग्राफी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टर रुग्णालयातून निघून गेले आणि त्यानंतर अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फोनवरून मिळालेल्या सूचनांनुसार उपचार सुरू ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
दरम्यान, १९ एप्रिल रोजी नितीन यांची प्रकृती अचानक खालावली. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील उपचारपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने नारपोली पोलिसांनी रुग्णाच्या उपचारांशी संबंधित कागदपत्रे वैद्यकीय अभिप्रायासाठी ठाणे येथील जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवली होती. २७ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या वैद्यकीय समितीच्या अहवालात संबंधित हृदयरोगतज्ज्ञांच्या उपचारपद्धतीत निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने आवश्यक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.
या वैद्यकीय अहवालाच्या आधारे १ ऑक्टोबर रोजी नारपोली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) आणि ३(५) अन्वये संबंधित डॉक्टरांसह रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित डॉक्टरांना अटक करावी आणि रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी तसेच आंबेडकरी युवा संघटनेने सातत्याने लावून धरली होती.
या प्रकरणातील वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपांची पार्श्वभूमी आणि कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर सोमवारी भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोबल हॉस्पिटलवर सीलबंदीची कारवाई केली. त्यामुळे नितीन वाघमारे यांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाविरोधात महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.


