(महाड / वृत्तसंस्था)
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शाश्वत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या ६५ वर्षीय शिवभक्ताचा पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २४) दुपारच्या सुमारास घडली. दिलीप शंकर गोसावी (वय ६५, रा. पुसेसावळी, जि. सातारा) असे मृत शिवभक्ताचे नाव असून, काही ठिकाणी त्यांचा उल्लेख दीपक शंकर गोसावी असा करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी सुमारे दीड वाजता किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शाश्वत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. सोहळा संपल्यानंतर रोपवे बंद असल्याने गोसावी हे गडावरून पायी खाली येत होते. त्यावेळी लघुशंकेसाठी जात असताना हत्ती तलाव परिसरातील निसरड्या पाऊलवाटेवर त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते खाली पडले. परिसरात सतत पाऊस असल्याने वाट निसरडी झाली होती. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
गोसावी हे आपल्या मित्रांसोबत रायगड किल्ल्यावर आले होते. घटना घडल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी तातडीने स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि त्यांच्या मित्रांनी डोलीच्या सहाय्याने गोसावी यांना गडावरून खाली आणले.
त्यानंतर त्यांना पाताळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. महाड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती दिली.
शाश्वत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आलेल्या शिवभक्ताच्या या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


