(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील केशवसृष्टी परिसरात ४४ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सरिता संदेश देवळे असे मृत महिलेचे नाव असून, त्यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरिता देवळे यांचे मूळ गाव करंबेळे असून, त्यांचे पती संदेश देवळे यांचा देवरूख शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. सरिता या एका पतसंस्थेसाठी पिग्मी गोळा करण्याचे काम करत होत्या. व्यवसायाच्या निमित्ताने देवळे कुटुंब देवरूखमधील केशवसृष्टी परिसरात वास्तव्यास होते.
सोमवारी दुपारी सरिता यांनी घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास संदेश देवळे यांनी वडापावचे दुकान बंद करून घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर या घटनेची माहिती देवरूख पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. त्यानंतर सरिता यांना देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सरिता यांनी आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची देवरूख पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.


