(मुंबई / प्रतिनिधी)
मुंबईच्या पर्यटन वैभवात आणखी एका आकर्षक स्थळाची भर पडणार आहे. पवई तलावाच्या गणेश घाट येथे सुमारे ३० कोटी रुपये खर्चून १८० मीटर लांबीचा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. या फाउंटनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, मराठ्यांचा पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईची गौरवशाली वाटचाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर केली जाणार आहे. देशातील सर्वात मोठ्या म्युझिकल फाउंटन्सपैकी एक ठरणाऱ्या या प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी ७ वाजता कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून, म्हाडाच्या माध्यमातून त्याची उभारणी करण्यात आली आहे. मुंबईच्या पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच पर्यटकांसाठी जागतिक दर्जाचे आकर्षण निर्माण करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या प्रकल्पात जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात आला आहे. म्युझिकल फाउंटन, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांच्या माध्यमातून विशेष दृश्य परिणामांसह तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार आहेत. यामध्ये मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास आणि पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती व वैभव तसेच मुंबईची गौरवशाली कहाणी प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
या शोचे प्रमुख आकर्षण म्हणजे तब्बल ४० मीटर (१३० फूट) उंचीपर्यंत झेपावणारे वॉटर जेट्स आणि २७ फायर जेट्स. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण यंत्रणा प्रोग्राम करण्यात आली आहे. रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्सच्या साहाय्याने पाण्याच्या विविध आकर्षक रचना साकारल्या जाणार आहेत. संगीताच्या तालावर थिरकणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा, वॉटर स्क्रीनवरील प्रोजेक्शन आणि लेझर प्रतिमा यांचा मिलाफ पर्यटकांना अनोखा दृक्-श्राव्य अनुभव देणार आहे.
या प्रकल्पाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही उपयोग होण्याची अपेक्षा आहे. फाउंटनमुळे तलावातील पाण्याचे एरेशन होणार असून, दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्याची प्रक्रिया होईल. परिणामी पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होणे, तापमान कमी होणे आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणे असे संभाव्य फायदे अपेक्षित आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन स्थळ विकास निधीतून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी म्हाडाची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती केली. प्रकल्पाचे आवश्यक आराखडे आणि मांडणी महानगरपालिकेकडे सादर केल्यानंतर त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. म्हाडा, महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या संचालन आणि देखभालीसंबंधीच्या तरतुदी संबंधित करारानुसार राबविण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या विद्युत विभागाने दिली.
प्रकल्पाच्या नियमित संचालनासाठी प्रशिक्षित कर्मचारी, स्वतंत्र कंट्रोल रूम, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन उपकरणे, अखंड वीजपुरवठ्यासाठी डीजी सेट आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक उपचार सुविधा, प्लास्टिक खुर्च्या आणि व्हीलचेअर यांचाही समावेश आहे. दररोज सुमारे तीन तासांच्या कालावधीत तीन शो आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निविदेमध्ये तीन वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्तीची तरतूद असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या संचालनाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.
तलावातील जलचरांच्या सुरक्षेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. फाउंटनमध्ये केवळ एलईडी दिवे वापरण्यात येणार असून, त्यांचा प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने दिला जाणार आहे. त्यामुळे जलचरांना हानी पोहोचू नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. तसेच ध्वनीची तीव्रता निर्धारित डेसिबल मर्यादेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. पर्यावरणीय नियमांचे पालन करून हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्यात आला आहे.
मुंबईच्या पर्यटन विकासाला नवी दिशा
छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि मराठ्यांचा पराक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच मुंबईच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मुंबईला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


