(खोपोली / रायगड )
रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन श्री विरेश्वर मंदिरात रविवारी पहाटे धाडसी चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत मागील दरवाजातून प्रवेश केला आणि भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे 12 किलो वजनाचे, अंदाजे 20 लाख रुपये किमतीचे चांदीचे आच्छादन चोरून नेले. या घटनेमुळे खोपोली परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी रविवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश करत थेट गाभाऱ्यात धाव घेतली आणि भगवान शंकराच्या पिंडीवरील मौल्यवान चांदीचे आच्छादन काही मिनिटांत लंपास केले. विशेष म्हणजे, संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून, फुटेजमध्ये दोन संशयित चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत.
CCTV फुटेजच्या आधारे तपासाला वेग
चोरीची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, मंदिर परिसरातील सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत.
मंदिरात सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरट्यांनी मागील प्रवेशद्वाराचा वापर करून चोरी केल्याने मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहाटेच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भाविकांमध्ये संताप, कठोर कारवाईची मागणी
खोपोलीतील ऐतिहासिक विरेश्वर मंदिर हे परिसरातील श्रद्धास्थान मानले जाते. त्यामुळे मंदिरातील चोरीची घटना समोर येताच भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना तातडीने अटक करून मंदिरांची सुरक्षा अधिक मजबूत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

