(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील मजगांव हे उत्कृष्ट शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील अनेक शिक्षकांनी शिक्षणक्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली आहे. विशेषतः इब्जी कुटुंबीयांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे मजगांवचे नाव जिल्ह्यात उज्ज्वल झाले आहे.
या परंपरेला पुढे नेत मजगांवचे सुपुत्र शोएब मुख्तार इब्जी यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. डी.एड. पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धतीने प्रभावित होऊन रायगड जिल्ह्यातील उरण येथील सिटीझन्स हायस्कूलमध्ये त्यांची नियुक्ती झाली.
शोएब इब्जी यांनी या संधीचे सोने करत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या अथक परिश्रमामुळे शाळेची गुणवत्ता व प्रतिष्ठा उंचावली. या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना रायगड जिल्ह्यातील “माधवबाग आदर्श शिक्षक पुरस्कार” बहाल करण्यात आला.
शिक्षणाबरोबरच शोएब इब्जी हे एक उत्तम कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कवी संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. याआधीही त्यांना AMP राष्ट्रीय पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार तसेच अल मुस्तफा कल्चर अँड लिटरेचर आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांसारखे बहुमान प्राप्त झाले आहेत. शिवाय ते गेली दहा वर्षे एसएससी बोर्ड परीक्षेचे सहाय्यक परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
पुरस्कार वितरण समारंभाला कोकण मतदार शिक्षक संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माधवबाग प्रशासक डॉ. राहुल जाधव, निर्भय पाटील सर, डॉ. अनिरुद्ध पाटील, बबन पाटील, अविनाश कदम, भुसे सर यांच्यासह शिक्षक, चाहत्यांची मोठी उपस्थिती होती. या प्रसंगी शोएब इब्जी यांना सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा मिळाल्या.

