(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव हद्दीतील गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने खचणाऱ्या रस्त्याच्या समस्येवर अखेर उपाययोजना करण्यात आली आहे. २००५ मध्ये मोरीच्या कामासाठी करण्यात आलेल्या ब्लास्टिंगनंतर या ठिकाणी सुमारे १०५ मीटर लांबीचा दुपदरी रस्ता दरवर्षी खचत होता. या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही रस्ता खचण्याचे प्रकार थांबत नव्हते. मात्र, यंदा जय भारत कंपनीने गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करून या धोकादायक ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती केली आहे. दुपदरी रस्त्याऐवजी या भागात पक्का डांबरी एकपदरी मार्ग तयार करण्यात आल्याने गेल्या अनेक वर्षांपासून कायम असलेला ‘डेंजर झोन’चा धोका काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, या उपाययोजनेची खरी परिणामकारकता आगामी पावसाळ्यातच स्पष्ट होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.
कोकणातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गावरील आणि कशेडी घाटातील अपघातांच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा ‘कशेडी घाट’ रोको आंदोलन केले होते. पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग तयार झाला असला, तरी चौपदरीकरणातील नवीन कशेडी घाटरस्ता कोकणाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंढवी फाट्यापर्यंत अस्तित्वात आहे. तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर श्री स्वामी समर्थ कशेडी मठाकडे जाणाऱ्या फाट्यापासून जुन्या महामार्गावरील घाटरस्ता अद्याप कायम आहे.
याच जुन्या महामार्गावरील भोगाव हद्दीत सुमारे १०५ मीटर लांबीचा रस्ता सातत्याने खचत असल्याने हा परिसर ‘डेंजर झोन’ म्हणून ओळखला जाऊ लागला होता. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पळचिल विभागातील १२ गावे आणि २८ वाड्यांमधील नागरिकांच्या वाहतुकीलाही त्यामुळे धोका निर्माण झाला होता.
या समस्येबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच प्रांत अधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. जुन्या महामार्गावरील धोकादायक भागाच्या दुरुस्तीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून दुरुस्तीच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, पावसाळा आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे काम बंद ठेवावे लागल्याने दुरुस्तीला विलंब झाला. या कालावधीत जय भारत कंपनीकडून स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरता ये-जा करण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, जुना कशेडी घाटरस्ता बंदच राहिल्याने ग्रामस्थांकडून दुरुस्तीच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर अलीकडेच पर्यायी मार्गावर पक्का डांबरी एकपदरी रस्ता तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
या कामाबाबत जय भारत कन्स्ट्रक्शनचे प्रमुख अमित माला केशव चंदनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरीच्या बाजूला सुमारे १०५ मीटर लांबीची आणि १५ फूट उंचीची गॅल्वनाइज्ड स्टील जाळी व दगडांचा वापर करून गॅबियन तंत्रज्ञानावर आधारित संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यापूर्वी खचणाऱ्या रस्त्याच्या भागात खोल जमिनीपर्यंत काँक्रीटीकरण करण्यात आले. दीर्घकाळ टिकणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर करून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या भागात डोंगराकडून कातळाच्या दिशेने मुरणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गटाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याखाली साचून रस्ता खचण्याच्या घटना टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मात्र, या दुरुस्तीच्या कामानंतरही एक महत्त्वाचा प्रश्न कायम आहे. ‘डेंजर झोन’च्या दोन्ही बाजूंना दुपदरी रस्ता असताना घाटातील तीव्र वळण आणि उताराच्या भागात अचानक एकपदरी रस्ता सुरू होतो. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना वेळीच अंदाज न आल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
२००५ पासून सातत्याने रस्ता खचण्याच्या समस्येमुळे पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने या धोकादायक पट्ट्यातील समस्या कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनीही काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तथापि, गॅबियन तंत्रज्ञान आणि नव्याने करण्यात आलेल्या बांधकामाची टिकाऊपणा व गुणवत्ता आगामी पावसाळ्यातील पावसाचा मारा सहन केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


