(पुणे / मोशी)
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोशी येथील कचरा डेपो परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मोशी कचरा डेपो शेजारील ग्राउंड प्लस दोन मजली (G+2) आरसीसी संरचनेतील कॅन्टीन व कार्यालयाची इमारत अचानक कोसळल्याने सुमारे 14 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत चार जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचा काही भाग घसरून इमारतीवर कोसळला. तसेच इमारतीचा पाया खचल्याने संपूर्ण संरचना कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना दुपारच्या जेवणाच्या वेळेत घडल्याने अनेक कर्मचारी इमारतीमध्ये उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पात आज दुपारी ही भीषण दुर्घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचरा डेपोतील उंच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी मुरले होते. त्यामुळे ढिगाऱ्याचे वजन वाढून त्याचा काही भाग अचानक घसरला आणि कचऱ्याचे भूस्खलन झाले.
घसरलेला हा प्रचंड कचऱ्याचा ढिगारा थेट प्रकल्पातील कॅन्टीन व कार्यालयाच्या इमारतीवर आदळल्याने इमारतीचा मोठा भाग क्षणार्धात कोसळला. दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये कर्मचारी उपस्थित असल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचाव पथकांनी तातडीने शोध व बचावकार्य सुरू केले आहे.
ढिगाऱ्याखालून मदतीसाठी आवाज
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचे आवाज ऐकू येत असून ते जिवंत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्निशमन दल, NDRF, स्थानिक पोलीस आणि इतर बचाव पथके अत्यंत काळजीपूर्वक शोधमोहीम राबवत आहेत.
NDRF, लष्कर आणि सर्व यंत्रणा घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), लष्कर तसेच महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवण्यासाठी यंत्रसामग्रीची मदत घेण्यात येत असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
गिरीश महाजन पुण्याकडे रवाना
दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नाशिकहून तातडीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. ते घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचाव व मदतकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश
या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करावी, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
पुण्यात मुसळधार पावसाचा फटका
दरम्यान, गेल्या काही तासांपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. या पावसामुळे मोशी येथील दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या नागरिकांची संख्या आणि दुर्घटनेतील नुकसानाबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

