(रत्नागिरी / चिपळूण)
चिपळूणमधील वाशिष्ठी नदीसह रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ उपशाच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी नाम फाउंडेशनचे सहकार्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या आठ दिवसांत सामंजस्य करार करून कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश डॉ. सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या संदर्भात चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत नदीपात्रांमधील गाळ उपशाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांच्यासह नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.
वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यापुरतेच हे काम मर्यादित न ठेवता भविष्यात नदीपात्रात वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटन सुविधा विकसित करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले. या दृष्टीने नदीपात्रातील बेटावरील गाळही काढण्याची सूचना त्यांनी केली. प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियेत लागणारा वेळ कमी करून कामाला तातडीने सुरुवात करता यावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाम फाउंडेशनला गाळ उपशाचे काम देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार आठ दिवसांत सामंजस्य करार आणि कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
वाशिष्ठी नदीबरोबरच जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, काजळी आणि अर्जुना या प्रमुख नद्यांमधील गाळ काढण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील अंतर्गत नद्यांमधील गाळ उपशासाठी स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाळ उपशासाठी प्रतिघनमीटर ३१ रुपये दर आकारला जाणार आहे. त्यामुळे शासकीय दराच्या तुलनेत कमी खर्चात तिप्पट गाळ काढणे शक्य होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या कामामुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पूरस्थितीचा धोका कमी करण्याबरोबरच पाणीटंचाईवर मात करण्यासाठीही मदत होणार आहे.
वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाच्या निर्णयामुळे चिपळूणमधील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कामालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


