(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि शिवाजीनगर बसस्थानकाच्या रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही बसस्थानकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असली, तरी निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली नाही. या विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही बसस्थानकांच्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक हे कोकणातील महत्त्वाचे आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असलेले केंद्र आहे. दररोज हजारो प्रवासी या बसस्थानकातून प्रवास करतात. या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यासाठी २ कोटी ८७ लाख रुपयांचा अंदाजित निधी निश्चित करण्यात आला असून, त्यातून रस्ते, बाह्य शेड आणि अन्य संरचनात्मक कामे सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
मात्र, पुनर्बांधणीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकली आहेत. या टप्प्यासाठी २ कोटी ३० लाख रुपयांचा अंदाजित निधी असून, त्यामध्ये फरशी बसविणे, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण आणि अन्य बांधकामांचा समावेश आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असली, तरी निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष कामे सुरू होऊ शकलेली नाहीत.
दुसरीकडे, शिवाजीनगर बसस्थानकाची अवस्थाही सुधारण्याची प्रतीक्षा आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेसची नियमित ये-जा असलेल्या या बसस्थानकात प्रवाशांसाठी मूलभूत सुविधांची वानवा आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था, मोकाट जनावरांचा वावर, अपुरी आसनव्यवस्था, अस्वच्छ बाकडे, पिण्याच्या पाण्याची गैरसोय तसेच वाढलेली झाडे-झुडपे यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाजीनगर बसस्थानकाच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी यापूर्वीच ३ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या कामाला १३ जानेवारी २०२६ रोजी प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. मात्र, निविदा प्रक्रिया पुढे सरकलेली नसल्याने निधीची तरतूद आणि प्रशासकीय मान्यता असूनही विकासकामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.
दोन्ही बसस्थानकांच्या विकासकामांना होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच रखडलेली निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून विकासकामे प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी केली.
या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चिपळूणच्या दोन्ही महत्त्वाच्या बसस्थानकांच्या विकासकामांबाबत सकारात्मक हालचाली होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र, निविदा प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होणार, याकडे चिपळूणमधील प्रवासी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.


