(वार्ताहर / पाली)
श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान, पाथरट येथील मंदिराचा कलशारोहण सोहळा तसेच वार्षिक कार्तिकी एकादशी व त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन १९ ते २४ नोव्हेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.
उत्सवाची सुरुवात गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुपारी ३ वाजता श्री लक्ष्मी पल्लिनाथ मंदिर, पाली येथून बाजारपेठ मार्गे कलशांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्रींचा अभिषेक व पूजा होईल. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत कलशपूजन, होमहवन आणि धार्मिक विधी पार पडतील. दुपारी २ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ७ स्थानिक भजन, ७ ते ७.३० आरती आणि रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन होणार आहे. रत्नागिरी येथील कीर्तनकार ह.भ.प. प्रसन्नराज जोशी कीर्तन सादर करतील. त्यांना हार्मोनियमवर चैतन्य पटवर्धन आणि तबल्यावर उदय गोखले साथ देणार आहेत.
शनिवार, २१ नोव्हेंबर हा उत्सवातील महत्त्वाचा दिवस असणार आहे. सकाळी ८ ते ९ या वेळेत श्रींचा अभिषेक व पूजा झाल्यानंतर सकाळी ९ ते १० या वेळेत श्री देव रेवणसिद्ध मठ संस्थान, रायपाटण, राजापूर येथील मठाधिपती श्री. ष. ब्र. १०८ महादय्या रवीशंकर शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी १० ते ११ धार्मिक विधी, तर दुपारी १२ ते २ या वेळेत खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ३ ते ५ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होईल. सायंकाळी ७ ते ८ आरती, रात्री ८ ते ९ स्थानिक भजन, तर रात्री ९ ते १० या वेळेत भोवत्या व पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्री १० वाजता ए वन म्युझिक हाऊस, मुंबई निर्मित ‘गोष्ट वारीची’ हा कार्यक्रम ६० कलाकारांच्या संचासह सादर केला जाणार आहे. त्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर तुळशी विवाह सोहळा पार पडणार आहे.
रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्रींचा अभिषेक व पूजा होईल. सायंकाळी ७ ते ८ आरती, रात्री ८ ते ९ स्थानिक भजन आणि रात्री १० वाजता श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान, पाथरट निर्मित ‘जीवन रेखा’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्रींचा अभिषेक व पूजा होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रत्नागिरी येथील नाडी तज्ज्ञ डॉ. योगेश मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ७ स्थानिक भजन, ७ ते ७.३० आरती आणि ७.३० ते ९.३० या वेळेत संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी-करडेवाडी येथील ओम आदिनाथ ऐक्यवर्धन शिष्य मंडळाचा हरिपाठ होणार आहे. रात्री १० वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्रींचा अभिषेक व पूजा, तर सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री सत्यनारायण पूजा व आरती होईल. दुपारी १२ ते १.३० या वेळेत लोटांगण प्रदक्षिणा आणि दुपारी १.३० ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ७ स्थानिक भजन, ७ ते ७.३० आरती आणि ७.३० ते ८.३० या वेळेत हातखंबा-डांगेवाडी येथील जंबुकेश्वर भजन मंडळाचा भजन कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत लकी ड्रॉ सोडत होईल. त्यानंतर रात्री १०.३० वाजता कलगी-तुऱ्याचा जंगी सामना रंगणार आहे. यामध्ये खेड येथील शक्तिवाले शाहीर ऋषिकेश कदम आणि लांजा येथील तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमण यांच्यात सामना होणार आहे. पसायदानाने या सहा दिवसीय उत्सवाची सांगता होईल.
या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात परिसरातील तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान, पाथरट यांच्यावतीने करण्यात आले आहे.


