( मुंबई )
राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ऑनलाईन भाडेकरार नोंदणी प्रणालीत (Online Rent Agreement Registration) गंभीर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे. या अडचणीचा फटका पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला बसला असून सुमारे 60 हजार भाडेकरार प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ऑनलाईन भाडेकरार नोंदणी ठप्प होण्यामागे आधार पडताळणीतील बिघाड हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी अनिवार्य असलेली UID (आधार) पडताळणी प्रक्रिया सध्या पूर्ण होत नाही. मुंबईतील माहिती तंत्रज्ञान संचलनालयाकडून (DIT) पाठवली जाणारी पडताळणी विनंती UIDAI पर्यंत पोहोचत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय, DIT च्या विंडोज सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ‘आय सरिता 2.0’ आणि ‘आय सरिता 1.9’ ही दोन्ही पोर्टल्स प्रभावित झाली आहेत.
या तांत्रिक अडचणीमुळे नवीन टोकन जनरेशन बंद झाले असून, आधी सादर केलेल्या अर्जांची पडताळणीही रखडली आहे. परिणामी, हजारो भाडेकरार नोंदणी अडकून पडल्या आहेत. ऑनलाईन सेवा बंद असल्याने नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दोन साक्षीदारांसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असल्याने कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे.
भाडेकरार हा वास्तव्याचा महत्त्वाचा कायदेशीर पुरावा असल्यामुळे, मुलांचे शालेय प्रवेश, बँक खाते उघडणे, पासपोर्ट, तसेच इतर तातडीच्या शासकीय प्रक्रियांवर याचा मोठा परिणाम होत आहे. अनेक नागरिकांची कामे केवळ भाडेकरार नसल्यामुळे रखडल्याचे चित्र आहे.
दरम्यान, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अधिकारी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सतत संपर्कात असून, तांत्रिक दोष दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ऑनलाईन भाडेकरार सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तोपर्यंत, ज्यांना तातडीने भाडेकरार नोंदणी आवश्यक आहे त्यांनी जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दोन साक्षीदारांसह प्रत्यक्ष (Physical Registration) पद्धतीने नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

