(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
गणपती विसर्जनासाठी कुटुंबीयांसह निघालेल्या ७० वर्षीय वृद्धाची प्रकृती अचानक बिघडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरीत घडली. अवधुत राजाराम शिरगावकर (वय ७०, रा. भागेश्वर मंदिराजवळ, किल्ला, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता अवधुत शिरगावकर हे कुटुंबीयांसह गणपती विसर्जनासाठी बोलेरो वाहनातून निघाले होते. ते वाहनाच्या पुढील बाजूस चालकाच्या शेजारील सीटवर बसले होते. कुटुंबीय गणपती घेऊन तळेकरवाडी, किल्ला येथे पोहोचले असता वाहनचालक सुनील याने अवधुत यांच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले. यानंतर खबर देणारे अतिश अविनाश शिरगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांनी अवधुत यांना तातडीने खासगी वाहनातून रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५१ वाजता उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ११५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व पुढील प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.


