(रत्नागिरी)
ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबत डिजिटल फसवणुकीच्या घटनांतही मोठी वाढ होत आहे. अशाच प्रकारात रत्नागिरीतील एका व्यक्तीला ऑनलाईन तिकीट बुकिंगची माहिती घेत असताना तब्बल ९३ हजार रुपयांचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित सदानंद पिलणकर (वय ५०, रा. रत्नागिरी) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पिलणकर हे ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी माहिती शोधत असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप लिंक आली. विश्वासाने त्यांनी ती लिंक उघडली आणि त्यात आवश्यक माहिती भरली. काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून ९३ हजार रुपये वजा झाल्याचा संदेश मोबाईलवर आला. फसवणुकीचा अंदाज येताच त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक, मेसेज किंवा कॉल्सवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. सायबर गुन्हेगार आता विविध नव्या पद्धतींनी लोकांना जाळ्यात ओढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
सायबर सुरक्षिततेचा मंत्र: अनोळखी लिंक किंवा अॅप डाउनलोड करू नका. आपल्या बँक खात्याची किंवा कार्डची माहिती कोणालाही देऊ नका. संशयास्पद व्यवहार त्वरित सायबर हेल्पलाइन ‘१९३०’ वर कळवा.

